भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेसबद्दल जागरुक आहे हे सर्वांनाच माहित आहे. आपल्या फिटनेसच्या जोरावर विराटने जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे. दरम्यान विराट कोहलीला आपल्या आहारात बदल करत कडकनाथ कोंबडा खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृषी विज्ञान केंद्राने विराट कोहलीला हा सल्ला दिला आहे.

मध्य प्रदेशातील जाबुआ येथील कृषी विज्ञान केंद्राने बीसीसीआय आणि विराट कोहलीसाठी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विराटला ग्रिल्ड चिकनऐवजी कडकनाथ कोंबडा खाण्याचा सल्ला दिला आहे. ‘कडकनाथ कोंबड्यात कोलेस्ट्रॉल आणि चरबीचं प्रमाण कमी असून प्रोटीन आणि लोह, प्रथिनांचं प्रमाण अधिक असतं’, असं पत्रात लिहिलं आहे.

काय आहे पत्रात –
‘आम्हाला प्रसारमाध्यमांमधून विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडू आपल्या आहारात ग्रिल्ड चिकन घेत असल्याची माहिती मिळाली. पण त्यात कोलेस्ट्रॉलचं असणारं प्रचंड प्रमाण आणि चरबी यामुळे तुम्ही वेगन डाएट आत्मसात केल्याचं समजलं.

कृषी विज्ञान केंद्र विराट कोहली आणि बीसीसीआयला सुचवू इच्छितं की, राष्ट्रीय संशोधन केंद्रानुसार झाबुआतील कडकनाथ कोंबड्यात कोलेस्ट्रॉल आणि चरबीचं प्रमाण फार कमी असून लोह आणि प्रथिनांचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुम्ही आणि संघातील इतर खेळाडूंनी आहारात कडकनाथचा समावेश करावा’.

विराट कोहलीने गतवर्षी गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्समधील मुलाखतीत बोलताना आपण लंचमध्ये ग्रिल्ड चिकन खात असल्याचं सांगितलं होतं. कृषी विज्ञान केंद्राला येथूनच ही माहिती मिळाली असल्याची शक्यता आहे. विराट कोहली कसोटी मालिकेसाठी सध्या ऑस्ट्रेलियात आहे. भारताने 2-1 ने आघाडी घेतली असून चौथा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

Story img Loader