मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची दोनशेवी कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेमध्ये साजरी होणार आहे. या मालिकेनंतर सचिन क्रिकेटला अलविदा करणार अशा चर्चाना बुधवारी उधाण आले होते. कामगिरी लौकिलाला साजेशी होत नसल्याने सचिनने २००व्या कसोटीनंतर पुढे खेळण्याबाबत विचार करावा यादृष्टीने निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी सचिन तेंडुलकरची भेट घेतली होती, असे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र गेल्या दहा महिन्यात सचिनची भेट घेतली नसल्याचे स्पष्टीकरण संदीप पाटील यांनी केले आहे.
‘‘सचिनला भेटणे आनंददायी असते. मात्र गेल्या दहा महिन्यांत मी त्याला भेटलेलो नाही. त्याच्याशी दूरध्वनीवरूनही संभाषण झालेले नाही. आमच्यात कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे मी सचिनची भेट घेतल्याच्या वृत्तात काहीच तथ्य नाही,’’ असे पाटील यांनी सांगितले.
बीसीसीआयने वेस्ट इंडिज संघाच्या दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय अशा छोटेखानी दौऱ्याला मंजुरी दिल्यानंतर सचिनच्या कसोटी कारकीर्दीतील दोनशेवी कसोटी भारतात होणार हे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी सचिनची भेट घेतल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये म्हटले जात होते. दोनशेव्या कसोटीनंतर सचिनच्या भवितव्याविषयी निवडसमिती निर्णय घेणार असल्याचेही स्पष्ट झाले होते. पाटील यांनी सचिनची भेट घेऊन पुढील एका वर्षांसाठी निवडसमितीच्या संघाबाबतच्या योजना, अधिकाअधिक युवा खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न आदी धोरणे मांडल्याचे म्हटले गेले होते.
‘‘अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत, त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. सचिनचे योगदान विसरता येणार नाही. त्याची कामगिरी अतुलनीय अशी आहे. मात्र त्याचवेळी भविष्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनेक युवा खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहे,’’ अशी माहिती एका निवड समिती सदस्याने दिली.
तेंडुलकरने १९८ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून, कसोटीत त्याच्या नावावर ५१ शतकांचा विक्रम आहे. कसोटीमध्ये सचिनच्या नावावर १६,००० धावा आहेत, मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शेवटच्या दहा कसोटीत त्याने केवळ दोनदा अर्धशतक झळकावले आहे. त्याचे शेवटचे कसोटी शतक २०१०मध्ये होते. या कामगिरीमुळे त्याच्या निवृत्तीविषयी उलटसुलट चर्चा होत आहेत. दरम्यान, सचिन सध्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे. २१ सप्टेंबरला मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्सशी लढत होणार आहे.
बीसीसीआयचासुद्धा इन्कार
नवी दिल्ली : दोनशेव्या कसोटीनंतर भवितव्याविषयी विचार करावा, यासंदर्भात निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी सचिन तेंडुलकरची भेट घेतल्याच्या वृताचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय)ने इन्कार केला आहे. ‘‘या वृत्तात काहीही तथ्य नाही. आम्ही सचिन आणि पाटील दोघांशीही बोललो आहोत. या दोघांमध्ये असे कुठलेही संभाषण झालेली नाही,’’ असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.

Story img Loader