भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी झालेल्या तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये रणजी कप्तान आणि प्रशिक्षकांच्या परिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या अनेक सूचनांचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात आला. आगामी स्थानिक हंगामाच्या पाश्र्वभूमीवर या सूचनांवर तांत्रिक समितीकडून गांभीर्याने विचारविमर्श करण्यात आला. आता एप्रिलमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये या शिफारसींसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. याचप्रमाणे विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेच्या स्वरूपात रणजीप्रमाणे बदल करण्यात येण्याची शक्यता नसल्याचे बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे प्रमुख अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले.
‘‘ही तांत्रिक समितीची प्राथमिक बैठक होती. काही दिवसांपूर्वी रणजी कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या झालेल्या परिषदेमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या सूचनांवर या बैठकीमध्ये सकारात्मकरीत्या चर्चा करण्यात आली. एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीत आम्ही या शिफारसींबाबत निर्णय घेऊ,’’ असे या बैठकीनंतर कुंबळे यांनी पत्रकारांना सांगितले.
५ मार्चला झालेल्या बैठकीमध्ये रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचे बादफेरीचे सामने तटस्थ ठिकाणी घेण्याची मागणी काही जणांनी केली होती. याबाबत कुंबळे यांनी सांगितले की, ‘‘येत्या हंगामात भारतात फारसे आंतरराष्ट्रीय सामने नाहीत. त्यामुळे तटस्थ ठिकाणी सामन्यांऐवजी काही निश्चित ठिकाणे बादफेरीच्या सामन्यांसाठी ठरवली जातील.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील दोन सामन्यांमधील अंतर वाढविण्याबाबत चर्चा झाली. कप्तान आणि कर्णधारांच्या परिषदेत सध्याच्या तीन दिवसांऐवजी चार दिवसांचे अंतर असावे, अशी सूचना करण्यात आली, परंतु यामुळे हंगाम लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरुवातीच्या सामन्यांदरम्यान तीन दिवस, तर उत्तरार्धातील सामन्यांमध्ये चार दिवसांचे अंतर ठेवण्याची शक्यता आहे.