BPL 2025 Tamim Iqbal and Alex Hales controversy : क्रिकेटच्या मैदानावर खेळादरम्यान अनेक वेळा खेळाडू एकमेकांशी भांडताना दिसतात. ही भांडणं सहसा खेळाशी संबंधित असतात. परंतु असे काही वेळा होते, जेव्हा खेळाडूंमधील भांडणं खेळाच्या पलीकडे जातात. असाच काहीसा प्रकार बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये तमिम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्स यांच्यात पाहायला मिळाला. या भांडणात बांगलादेशी क्रिकेटर तमीम इक्बालने मर्यादा ओलांडल्याने प्रकरण चांगलेच तापले.
वास्तविक, ही संपूर्ण घटना बांगलादेश प्रीमियर लीगच्या २०२५ च्या रंगपूर रायडर्स आणि फॉर्च्युन बरीशाल सामन्यानंतर घडली. जेव्हा रंगपूर रायडर्सचा सलामीवीर फलंदाज ॲलेक्स हेल्स फॉर्च्युन बरीशालचा कर्णधार तमीम इक्बालशी हस्तांदोलन करण्यासाठी गेला होता. या सामन्यात रंगपूर रायडर्स संघाने शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यातील पराभवानंतर बरीशालचा कर्णधार तमीम इक्बाल चांगलाच निराश झाला होता. यावेळी तो ॲलेक्स हेल्सशी हस्तांदोलन करण्यासाठी गेला असता वाद झाला.
का झाला वाद?
रिपोर्ट्सनुसार, फायनलमधील पराभवामुळे नाराज झालेल्या तमीम इक्बालशी हस्तांदोलन करण्यासाठी ॲलेक्स हेल्स आला होता, तेव्हा फॉर्च्युन बारिशालचा कर्णधार इंग्लंडच्या खेळाडूला म्हणाला, ‘तू असं का वागतोय? तुला काही बोलायचे असेल तर माझ्यासमोर बोल. तमिमच्या अशा बोलण्याने ॲलेक्स हेल्स चांगलाच संतापला आणि दोघात वाद पेटला. प्रकरण इतके वाढले की सहकारी खेळाडूंना मध्यस्थी करुन या दोघांना एकमेकांपासून दूर करावे लागले.
ॲलेक्स हेल्स काय म्हणाला?
या घटनेनंतर ॲलेक्स हेल्सने तमिमवर वैयक्तिक कमेंट करत तो अजूनही ड्रग्ज घेत आहे का? असं विचारल्याचा आरोप केला आहे. २०१९ मध्ये ॲलेक्स हेल्सवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता, त्यामुळे त्याच्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. या प्रकरणावर तमिमने त्याच्यावर भाष्य केले.ॲलेक्स हेल्स मुलाखतीत या घटनेचा उल्लेख करताना म्हणाला की, “मला माहित नाही, तमीम कोणत्या गोष्टीबद्दल नाराज होता. आम्ही हस्तांदोलन करताना त्याने मला विचारले की, तुला काही बोलायचे आहे का आणि जर बोलायचे असेल तर माझ्यासमोर बोल. यानंतरही मी त्याला काहीच बोललो नाही. पण त्यानंतर तो वैयक्तिक गोष्टीबद्दल बोलू लागला जे योग्य नव्हते. त्यामुळे मला वाटते खेळाव्यतिरिक्त मैदानावर बाहेरच्या गोष्टी आणू नयेत.”
हेल्सच्या आरोपांवर तमीम इक्बाल काय म्हणाला?
u
आरोपांवर बोलताना तमीम इक्बाल म्हणाला, “काही झालं नव्हतं, तर मी त्याला का रोखलं असतं? तो माझा १७ वर्षांचा सहकारी इक्बाल हुसैन इमॉनची खिल्ली उडवत होता. त्याचबरोबर त्याला शिवीगाळही केली जे टीव्हीवर दिसले. तुम्ही सेलिब्रेशनचा व्हिडिओ नीट पाहिला तर लक्षात येईल. रंगपूरचे खेळाडू विजयानंतर नुरुलच्या दिशेने धावले, पण हेल्स माझ्याकडे रागाने बघत होता आणि खिल्ली उडवत होता. यावेळी असं वाटतं होतं की त्याला माझ्याशी वाद घालायचा होता. यानंतर जेव्हा त्याने इमॉनचा पुन्हा अपमान केला, तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यासाठी उभा राहिलो. त्यामुळे मला या गोष्टीचा कोणताही पश्चात्ताप नाही.”
तो पुढे म्हणाला, “आमच्या दोघांत शाब्दिक चकमक झाली. पण माहीत नव्हतं की त्याच्यावर ड्रग्जप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. मला फक्त इतकचं माहीत आहे की, त्याच्यावर इंग्लंडमध्ये अनेक आरोप आहेत. माझ्याबद्दल किंवा माझ्या संघाबद्दल कुणी काही बोललं, तर मी नेहमीच आमच्या संघाच्या बाजूने उभा राहीन. मग भले मला कशा प्रकारे टीव्हीवर दाखवले तर मला त्याचा फरक पडत नाही.” या सामन्यात तमीम इक्बालच्या नेतृत्त्वाखाली फॉर्च्युन बरीशालने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावत १९७ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात रंगपूर रायडर्सने दमदार फलंदाजी करत शेवटच्या षटकात बाजी मारत विजय मिळवला.