Aakash Chopra on Shreyas Iyer: टीम इंडिया २०२३च्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे. ३६ वर्षीय रोहित शर्माचा कर्णधार म्हणून हा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक ठरू शकतो, असे मानले जात आहे. त्यामुळे क्रिकेटच्या वर्तुळात नव्या कर्णधाराची चर्चा सुरू झाली आहे. संभाव्य भावी कर्णधारांच्या यादीत श्रेयस अय्यरच्या नावाचाही समावेश आहे. अय्यरला कर्णधार बनवण्याच्या चर्चांवर आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.
आकाश चोप्राने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, “श्रेयस अय्यर एक चांगला खेळाडू आहे, त्याने न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकले आणि दुसऱ्या डावातही धावा केल्या. पण माझ्या मते श्रेयस अय्यरला अजूनही कसोटी फलंदाज म्हणून खूप काही सिद्ध करायचे आहे. त्याच्या फलंदाजी तंत्रात त्याला मोठे बदल करणे आवश्यक आहेत.”
श्रेयस अय्यरला ‘या’ दोन गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत
समालोचक आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “श्रेयस बांगलादेशातही खूप चांगला खेळला. तो फिरकी खूप छान खेळतो यात शंका नाही. मात्र, त्याच्या त्याला मोठा खेळाडू होण्यासाठी दोन गोष्टी बदलणे आवश्यक आहेत. पहिला स्विंगिंग बॉल आणि दुसरा बाउन्सर. या दोघांवर जर त्याने काम केले तर त्याच्यासारखा विरोधी संघांसाठी धोकादायक फलंदाज कोणीच असू शकत नाही. मधल्या फळीत भारताची समस्या देखील मिटेल. जर त्याने यावर काम केले तर त्याचा संघात पुन्हा समावेश होऊ शकतो.”
अय्यरला कर्णधार म्हणायला खूप घाई करतो आहे का?
श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याबाबत आकाश चोप्रा म्हणाला की, “जोपर्यंत तो या दोन्ही गोष्टींमध्ये पारंगत होत नाही तोपर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत प्रगती होईल की नाही हे सांगणे कठीण आहे, त्यामुळे त्याला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणणे घाईचे होईल. माझ्या मते श्रेयस अय्यर हा भारतीय कसोटी संघाचा कायमस्वरूपी सदस्य आहे आणि त्याच्याकडे अजून बराच वेळ आहे. त्याआधी त्याने सततच्या दुखापतींवर मात करणे गरजेचे आहे. त्याच्या या दुखापतींमुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो.”
श्रेयस अय्यरबाबत अनिश्चितता
आता फक्त अनिश्चितता श्रेयस अय्यरच्या बाबतीत आहे, ज्याच्या पाठीवर एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली. राहुल आणि बुमराहसोबत अय्यरही सध्या एन.सी.ए.मध्ये आहे. अय्यर सध्या एनसीएमध्ये फिजिओथेरपी घेत आहेत आणि जर त्यांच्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, त्यांना कौशल्य प्रशिक्षण सुरू होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. अशा स्थितीत विश्वचषकात त्याच्या पुनरागमनाबद्दल अनिश्चितता आहे.