पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात चांगली झुंज दिली. भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत ऑस्ट्रेलियाने रांचीच्या मैदानात 300 धावांचा टप्पा पार केला. भारताकडून कुलदीप यादवने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. कुलदीपने यावेळी एका संकेतस्थळाशी बोलत असताना, मैदानावर धोनी आणि आपल्यातल्या नात्याचे पैलू उघडून दाखवले.
अवश्य वाचा – ‘आर्मी कॅप’ घालून खेळणाऱ्या भारतीय संघावर कारवाई करा ! पाक मंत्र्यांची मागणी
“फिरकीपटू असो किंवा जलदगती गोलंदाज, मैदानात असताना धोनी देत असलेल्या टिप्स ऐकणं प्रत्येकासाठी गरजेचं असतं. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, आणि हा अनुभव तो आमच्याशी नेहमी शेअर करत असतो. धोनी गोलंदाजीदरम्यान प्रत्येकाला छोट्या-मोठ्या सुचना देत असतो, ज्याचा सामन्यात फायदा होतो. त्याला प्रतिस्पर्धी फलंदाजांचे सर्व बारकावे माहिती आहेत.” कुलदीपने धोनीचं कौतुक केलं.
दरम्यान, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी मात करत मालिकेत आपलं आव्हान कायम राखलं आहे. सध्या भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा सामना रविवारी मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – अटीतटीच्या लढतीत इंग्लंडची एका धावेने बाजी, भारतीय महिलांना व्हाईटवॉश