बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या काही सामन्यांपासून आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या ऋषभ पंतची कामगिरी पहिल्या वन-डे सामन्यातही यथातथाच होती. रोहित शर्माला DRS चा निर्णय घेण्यासाठी पंतने चुकीचा सल्ला दिल्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झाला. यानंतर धोनीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्याबद्दल मागणी सुरु झाली. मात्र बीसीसीआयने धोनीला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी एक महत्वाची अट घातली आहे.

“जर धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचं असेल तर त्याने आधी स्थानिक क्रिकेट खेळावं. जोपर्यंत तो स्थानिक क्रिकेट खेळणार नाही, तोपर्यंत त्याचा विचार केला जाणार नाही.” BCCI मधील एका उच्च अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला ही माहिती दिली. २०१९ विश्वचषकानंतर धोनी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. निवड समितीने काही दिवसांपूर्वी यापुढील काळात धोनीचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान क्रिकेटपासून दूर असताना धोनी झारखंड क्रिकेट असोसिएशनमध्ये रोज हजेरी लावतो आहे. रोज जिममध्ये व्यायाम, टेनिस खेळणं हा त्याचा दिनक्रम सुरु आहे. मात्र तो स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणार की नाही याबद्दल अजुन स्पष्ट माहिती नसल्याचं झारखंड क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी काळात धोनी पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीत मैदानात दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.