Irfan Pathan on criticizing Hardik Pandya during IPL 2024 : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासाठी मागील काही महिने खुप संघर्षाचे होते. आयपीएल २०२४ मध्ये त्याच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सच्या कामगिरीने त्याला क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडूंचे लक्ष्य बनवले होते. माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण देखील हार्दिकचा कठोर टीकाकार बनला होता, परंतु टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिकने ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यानंतर अचानक त्याच्यासाठी परिस्थिती बदलली.

हार्दिक पंड्याला ट्रोलिंगचा करावा लागला होता सामना –

टी-२० विश्वचषकापूर्वी आयपीएल २०२४ चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स संघाची कमान सांभाळली होती. रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे संघाची कमान सोपवण्यात आली होती, त्यामुळे मुंबई आणि रोहितचे चाहते प्रचंड संतापले होते. मुंबईच्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर हार्दिकला ट्रोल करताना जोरदार घोषणाबाजी केली होती.

इरफानने हार्दिकवर टीका करण्याचे कारण सांगितले –

स्टार स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना इरफान पठाण म्हणाला की, त्याने हार्दिकवर टीका केली. कारण आयपीएल २०२४ मध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. इरफान म्हणाला, “हार्दिक पंड्यासाठी हा प्रवास खास होता. त्याने टीकेतून स्वत:ला यशस्वीपणे सावरले आणि पुनरागमन केले. आयपीएलदरम्यानची कामगिरी चांगली नसल्यामुळे हार्दिकवर टीका करणाऱ्यांमध्ये मीही होतो. त्यावेळी हार्दिकने अनेक चुका केल्या होत्या.”

हेही वाचा – बुमराह-स्मृतीने रचला इतिहास, पहिल्यांदाच एका देशाच्या दोन खेळाडूंनी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारावर कोरले नाव

इरफान पठाण पुढे म्हणाला, “तेथून परत येणे आणि विश्वचषक जिंकणे विशेष होते. त्यांने आपली प्रतिभा सिद्ध करताना दमदार प्रदर्शन केले. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासोबत त्याने भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण स्पर्धेत त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली ते खूप खास आहे. “

हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी –

पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ हंगामापूर्वी रोहितच्या जागी संघाची कमान हार्दिककडे सोपवली होती. या निर्णयावर बरीच टीका झाली आणि हा हंगाम हार्दिकसाठी चांगला नव्हता. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब होती. संघ केवळ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही, तर गुणतालिकेत तळाच्या १०व्या स्थानावरही राहिला.