२०१९ चं वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चांगलं राहिलेलं आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी हे वर्ष अतिशय चांगलं राहिलेलं आहे. विश्वचषकातली धडाकेबाज ५ शतकं झळकावत रोहितने आपले इरादे स्पष्ट केले होते. भारतीय संघातल्या युवा खेळाडूंनीही गेल्या वर्षात चांगली कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्ध मालिकेत रोहित शर्माने विश्रांती घेणं पसंत केलं आहे, यावेळी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रोहितने आपल्या तरुण साथीदारांचं कौतुक केलं आहे. विशेषकरुन चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी श्रेयस अय्यर योग्य उमेदवार असल्याचंही रोहितने यावेळी बोलताना सांगितलं.

लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे हे खेळाडू एकाच वेळी संघात एकत्र खेळले नाहीयेत. ज्यावेळी त्यांच्यावर जबाबदारी येईल त्यावेळी त्यांच्या खेळात आत्मविश्वास येईल. गोष्टी आता बदलत आहेत. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करतो आहे. विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेतही ऋषभने चांगली कामगिरी केली. श्रेयसला आता माहिती झालंय की तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. तो आता आपल्या ठरलेल्या रणनितीसारखा खेळू शकतो. इतरांनाही अगोदर संघातली आपली जागा पक्की करावी लागेल, रोहितने आपल्या मुंबईकर साथीदाराचं कौतुक केलं.

श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर महिन्याअखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत रोहित भारतीय संघात पुनरागमन करेल, यानंतर न्यूझीलंडच्या वातावरणात खेळणं हे देखील मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – हार्दिक भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज, न्यूझीलंड दौऱ्यात मिळणार संधी?

Story img Loader