अन्वय सावंत, लोकसत्ता
चेन्नई : मुंबईतील ‘मैदान क्रिकेट’च्या तालमीत तयार झालेला खडूस क्रिकेटपटू…शिस्तबद्ध…कठोर अशी विविध विशेषणे चंद्रकांत ऊर्फ चंदू पंडित यांच्याबाबतीत वापरली जातात. मात्र, त्यांना अगदी चपखल बसेल असे अन्य एक विशेषण म्हणजे ‘विजेता’. संघ कुठलाही असो, त्यात खेळणारे खेळाडू कितीही अनुभवी किंवा नवखे असोत, त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याचे कसब प्रशिक्षक पंडित यांच्याकडे आहे. मुंबई, विदर्भ आणि मध्य प्रदेशला रणजी करंडक मिळवून दिल्याने पंडित यांची देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक अशी ख्याती होतीच. मात्र, आता जागतिक दर्जाची ट्वेन्टी-२० स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद मिळवून देत प्रशिक्षक म्हणून आपले श्रेष्ठत्व पंडित यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. यावेळी त्यांना अन्य एक मुंबईकर अभिषेक नायरचीही मोलाची साथ लाभली.
कोलकाता नाइट रायडर्सने आपली दशकभराची प्रतीक्षा संपवताना यंदाच्या ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले. कोलकाताने यापूर्वी २०१२ आणि २०१४ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. या तीन जेतेपदांमधील एक समान धागा म्हणजे गौतम गंभीर. कोलकाताच्या संघाने यापूर्वीची दोन जेतेपदे गंभीरच्या नेतृत्वाखाली मिळवली होती. यंदा तो प्रेरक (मेंटॉर) म्हणून कोलकाता संघाशी जोडला गेला आणि हा संघ पुन्हा करंडक उंचावण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे गंभीरचे सर्वत्र कौतुक झाले. त्याच वेळी या संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे मात्र पडद्यामागेच राहिले आहेत. परंतु, कोलकाताच्या खेळाडूंना या दोघांचे मोल निश्चितपणे ठाऊक आहे.
हेही वाचा >>> Team India : अभिषेक-रियानसह ‘हे’ पाच खेळाडू लवकरच भारतासाठी खेळताना दिसणार, पाहा कोणत्या दौऱ्यात मिळणार संधी?
‘‘माझ्या डोक्यात केवळ एका व्यक्तीचाच विचार येत आहे, ज्याने कोलकाता संघातील भारतीय स्थानिक खेळाडूंना घडवले आहे. तो व्यक्ती म्हणजे अभिषेक नायर,’’ असे सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर कोलकाता संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती म्हणाला. मुंबईकडून रणजीपटू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या माजी अष्टपैलू नायरला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी संधी मिळाली नाही. मग खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षणात रस घेतला. दिनेश कार्तिकची कारकीर्द एका जागीच थांबली असताना, त्याने नायरची मदत घेतली. नायरच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकने आपल्या खेळातील आणि तंदुरुस्तीतील उणिवा दूर केल्या. परिणामी कार्तिकने गेल्या काही ‘आयपीएल’ हंगामांत दमदार कामगिरी केली आणि दरम्यानच्या काळात तो भारतीय संघाकडूनही खेळला.
कार्तिक कोलकाताचा कर्णधार असतानाच नायर या संघाशी जोडला गेला. कोलकाता संघाच्या अकादमीत तासनतास घाम गाळत नायरने रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांसारख्या खेळाडूंना तयार केले. अंगक्रिश रघुवंशीनेही नायरकडे राहूनच क्रिकेटचे धडे गिरवले. दादरमधील शिवाजी पार्क, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये नायरने कोलकाता संघातील स्थानिक खेळाडूंबरोबर मिळून प्रचंड मेहनत घेतली. त्याच्या या मेहनतीचे फळ आज सगळ्यांच्या समोर आहे.
नायरही ज्यांना गुरू मानतो, अशा चंद्रकांत पंडित यांचेही कोलकाता संघाच्या यशातील योगदान विसरून चालणार नाही. ब्रेंडन मॅककलमने प्रशिक्षक म्हणून इंग्लंड संघाची वाट धरल्यानंतर २०२२ मध्ये पंडित यांच्याकडे कोलकाता संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तीन संघांना रणजी करंडक मिळवून दिल्यानंतरही पंडित यांची प्रशिक्षणाची शैली ‘आयपीएल’मध्ये कितपत यशस्वी होईल, याबाबत अनेकांना शंका होती. गेल्या वर्षी कोलकाताचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी राहिल्यानंतर शंका उपस्थित करणाऱ्यांची संख्या आणखी वाढली. त्यातच गेल्या वर्षी कोलकाता संघाचा भाग राहिलेल्या डेव्हिड विजाने यंदाच्या हंगामापूर्वी पंडित यांच्या प्रशिक्षणाच्या शैलीवर टीका केली होती. ‘‘पंडित हे अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय आहेत. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये तुमच्या संघात परदेशी खेळाडूही असतात, ज्यांना जगभरात खेळण्याचा अनुभव असतो. त्यांना तुम्ही कसे वागले पाहिजे, काय केले पाहिजे, कसे कपडे घातले पाहिजेत हे सांगितलेले आवडत नाही. त्यामुळे माझा पंडित यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अवघड होता,’’ असे विजा म्हणाला होता.
मात्र पंडित यांची शैली ‘आयपीएल’मध्येही यशस्वी होऊ शकते हे यंदा सिद्ध झालेच. ‘‘मध्य प्रदेश संघात पूर्वी आम्ही केवळ बाद फेरी गाठण्याचा विचार करायचो, पण पंडित सरांनी आम्हाला रणजी करंडक जिंकण्याचा विश्वास मिळवून दिला,’’ असे वेंकटेश अय्यरने एका मुलाखतीत सांगितले होते. याच वेंकटेशने रविवारी ‘आयपीएल’च्या अंतिम लढतीत नाबाद अर्धशतकी खेळी करताना कोलकाता संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोलकाता संघासाठी अविस्मरणीय ठरलेल्या या हंगामात पंडित फारसे प्रकाशझोतात आले नसले, तरी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले हे निश्चित.