मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी सर्वात मोठा विजय ३३७ धावांचा होता, जो २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळाला होता. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली आहे. यापूर्वी कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. मालिका विजयानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघ आणि युवा खेळाडूंचे कौतुक केले. यासह द्रविडने वरिष्ठ खेळाडूंच्या दुखापती आणि युवा खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी ही निवड समितीसाठी मोठी डोकेदुखी असल्याचे वर्णन केले आहे.

राहुल द्रविड म्हणाला, ”मला वाटते, की मालिकाविजय हा चांगला शेवट होता. कानपूर कसोटीतील सामना अगदी जवळचा होता. आम्ही शेवटची विकेट घेऊ शकलो नाही, आम्हाला तिथे खूप मेहनत करावी लागली. मुंबई कसोटीचा निकाल एकतर्फी लागला, आम्ही ३७२ धावांच्या फरकाने विजय मिळवला, पण मालिकेत आम्हाला खूप मेहनत करावी लागली. असे प्रसंग आले आहेत, की आम्ही मागे होतो आणि आम्हाला पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करावा लागला. याचे श्रेय संघाला जाते. नवीन खेळाडूंना पुढे जाताना आणि संधींचा फायदा घेताना पाहून आनंद झाला. होय, आम्ही काही वरिष्ठ खेळाडूंना मिस केले.”

हेही वाचा – IND vs NZ : विश्वविक्रमी गोलंदाजांनं जाता जाता मुंबईला दिलं गोड ‘गिफ्ट’! वाचा एजाज पटेलनं नेमकं दिलं काय?

तो पुढे म्हणाला, “याचे श्रेय त्या खेळाडूंना जाते ज्यांनी पुढे येऊन चमकदार कामगिरी केली. जयंत यादवने आज जबरदस्त खेळ दाखवला. मात्र, कालचा दिवस त्याच्यासाठी कठीण होता. पण त्यातून शिकून त्याने आज चांगली कामगिरी केली. मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, ज्या खेळाडूंना फारशी संधी मिळत नाही, त्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अक्षरने दाखवून दिले, की तो बॅटने काय करू शकतो. यासह संपूर्ण मालिकेत त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते पाहणे खूप छान वाटले.”

फॉलोऑन न देण्याबाबत द्रविड..

द्रविड म्हणाला, “आम्हाला माहीत होते, की आमच्याकडे भरपूर वेळ आहे, आम्ही फॉलोऑनचा फारसा विचार केला नाही. संघात अनेक युवा फलंदाजही होते, त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना फलंदाजीची संधी द्यायची होती. आम्हाला माहीत होते, की आम्ही भविष्यात अशा परिस्थितीत असू शकतो जिथे आम्हाला कठीण परिस्थितीत असे करण्यास भाग पाडले जाऊ शकते. म्हणून ही एक उत्तम संधी होती.”

निवड समितीसाठी चांगली डोकेदुखी

“ही चांगली परिस्थिती आहे, आमचे वरिष्ठ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण आपल्या खेळाडूंचे शारीरिक आणि मानसिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हे माझ्या आव्हानाचा एक मोठा भाग असणार आहे, निवड समितीसाठी आणि नेतृत्व गटासाठीही आव्हान आहे. ही एक चांगली (निवड) डोकेदुखी आहे, युवा खेळाडूंना चांगले करण्याची खूप इच्छा आहे आणि ते सर्व एकमेकांना मागे टाकत आहेत”, असेही द्रविडने म्हटले.

Story img Loader