मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीत इंग्लंडने भारतावर 3-2 ने मात करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती. इंग्लंडच्या युवा संघाचं हे दुसरं विजेतेपद ठरलं आहे.

पहिल्या सत्रापासून भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करायला सुरुवात केली होती. चौथ्या मिनीटाला विष्णुकांत सिंहने पेनल्टी कॉर्नवर मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करुन भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र सातव्या मिनीटाला इंग्लंडच्या डॅनिअल वेस्टने सुरेख मैदानी गोल करत संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी बचावात्मक पवित्र अवलंबल्यामुळे गोल होऊ शकले नाहीत.

मात्र तिसऱ्या सत्रानंतर इंग्लंडने आपल्या खेळाची गती वाढवत, भारताच्या गोलपोस्टवर हल्ले करण्यास सुरुवात केली. इंग्लंडच्या या पवित्र्यामुळे भारतीय खेळाडू बॅकफूटवर गेले. 39 व्या आणि 42 व्या मिनीटाला इंग्लंडच्या जेम्स ओटसने गोल करत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. भारताच्या अभिषेकने चौथ्या सत्रात 55 व्या मिनीटाला एक गोल झळकावत इंग्लंडची आघाडी कमी केली. मात्र यानंतर इंग्लंडचा बचाव भेदणं भारताला जमलं नाही, अखेर 3-2 च्या फरकाने सामना जिंकत इंग्लंडने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

Story img Loader