दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतल्या पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर मात केली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेने आपल्या नावे केली आहे. एका बाजूला दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू शानदार कामगिरीने सर्वांची मनं जिंकत असताना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान उभय संघांमधील खेळाडूंमधील शाब्दिक चकमकीने या मालिकेला गालबोट लागलं आहे.
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅसी वेन डेर डूसेन यांच्यात भर मैदानावर शाब्दिक चकमक झाली. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. रॅसी वेन डेर डूसेन फलंदाजी करत होता, तेव्हा यष्टीमागे उभा असलेला बटलर त्याला काहीतरी म्हणाला. त्यावर रॅसीनेही चेहऱ्यावरील हावभावाने उत्तर दिलं.
मैदानावर काय घडलं?
दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू असताना १९ व्या षटकात रॅसी वेन डेर डूसेन फलंदाजी करत होता तेव्हा स्ट्राईकर एंडला इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत होता, रॅसी वेन डेर डूसेन तिथेच उभा होता. तो जागचा हलला नाही. बटलरने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने फलंदाजाला सांगितलं की, “माझी वाट अडवू नको. मी चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय.” यावर रॅसी वेन डेर डूसेन म्हणाला, “हो मी तुला पाहिलं.” त्यानंतर बटलरला राग आला आणि तो रॅसीला म्हणाला “तुझी अडचणं काय आहे रॅसी? मला चेंडू अडवण्याची आणि झेलण्याची परवानगी आहे.”
हे ही वाचा >> विश्लेषण: भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे जेतेपद ऐतिहासिक का ठरले?
पंचांनी दोघांनाही थांबवलं
दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्याचं पंचांनी पाहिल्यावर त्यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पंचांच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण वाढलं नाही आणि सामना पुढे सुरू झाला. परंतु यावेळी दोन खेळाडूंमध्ये नेमकं काय बोलणं झालं ते यष्टीमधील माईकमध्ये (स्टम्प माईक) रेकॉर्ड झालं आहे.