नेमबाजी या खेळात रायफल, पिस्तूल अशा उपकरणांचा उपयोग केला जातो. एरव्ही हिंसक गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी खेळासाठी सकारात्मकतेसाठी उपयोगात आणल्या जातात. प्राण्यांविरुद्ध कोणीही हिंसक प्रकाराचा अवलंब करू नये तसेच त्यांच्याप्रती भूतदया दाखवावी यासाठी पिस्तूल नेमबाजपटू हिना सिद्धूने पुढाकार घेतला आहे. प्राण्यांच्या चांगल्या आरोग्यमानासाठी काम करणऱ्या पेटा (पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स) संस्थेसाठीच्या नव्या जाहिरातीत हिना सिद्धूने काम केले आहे. हातात पिस्तूल असलेली हिना आपल्या फोनमध्ये सेल्फी (स्वयंचित्र) काढत असल्याचे दिसते आहे. ‘शूट सेल्फीज, नॉट अॅनिमल्स- से नो टू हंटिंग’ (स्वयंचित्र काढा, मात्र प्राण्यांना मारू नका, शिकारीला नाही म्हणा) असे वाक्य लिहिले आहे. छायाचित्रकार गौरव सॉन यांनी या जाहिरातीची निर्मित्ती केली. ‘‘प्राण्यांची शिकार हे क्रुरतेचे प्रतीक आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. वाघ, बिबटय़ा, गेंडा, हत्ती यासारख्या प्राण्यांची त्यांच्या कातडी तसेच शिंगासाठी हत्या केली जाते. या प्राण्यांची शिकार होत असल्याचे लक्षात आल्यास त्याची पोलिसांना कल्पना द्या,’’ असे पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या हिनाने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा