रिओ ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारीला लागलेल्या हिना सिधूने १३व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात हीनाने अव्वल स्थान पटकावले.
काही दिवसांपूर्वीच भारतात झालेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत हीनाने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. तोच सूर कायम राखत हीनाने १९८.२ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. मंगोलियाच्या गुंडेगमा ओटयार्डने १९८ गुणांसह रौप्य तर कोरिया जंगमी किमने १७६.२ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
१० मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ प्रकारात भारताच्या श्री निवेथाने १९५.८ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रेया गावंडे, श्री निवेथा आणि ओशिन तवानी या त्रिकुटाने १११४ गुणांसह सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर कब्जा केला. नयनी भारद्वाज, हर्षदा निथावे आणि मलाइका गोएल या त्रिकुटाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.
पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात शिवम शुक्लाने ५७६ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. शिवमसह अर्जुन दास आणि आचल प्रताप ग्रेवाल या त्रिकुटाने सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले.
कनिष्ठ स्किट पुरुषांमध्ये अंगद बाजवाने सुवर्णपदक पटकावले. अंगद बाजवा, अनंत नरुका आणि अर्जुन मान त्रिकुटाने ३४७ गुणांसह सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा