जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिना सिद्धू हिने आपल्या कामगिरीत सातत्य राखत फोर्ट बेनिंग, अमेरिका येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीमुळे क्रमवारीत अव्वल स्थानाचा मुकुट परिधान करण्याच्या दिशेने हिनाने कूच केली आहे.
२४ वर्षीय हिनाने १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या पात्रता फेरीत ९८, ९६, ९६, ९६ असे गुण मिळवत एकूण ३८६ गुण पटकावले. अंतिम फेरीत तिने २००.८ गुणांची कमाई करत रौप्यपदकाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक पदके पटकावणारी ती भारताची पहिली नेमबाज ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिनाचे हे सलग तिसरे पदक ठरले.
याच स्पर्धेत मलायका गोएल या १६ वर्षीय नेमबाजाने पात्रता फेरीत ४०० पैकी ३८५ गुण मिळवून अंतिम फेरीत मजल मारली होती. मात्र अंतिम फेरीत ११९.४ गुण मिळवल्यामुळे तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या एअर रायफल प्रकारात, लंडन ऑलिम्पिक पदकविजेत्या गगन नारंगची अंतिम फेरी १.५ गुणांनी हुकली.

Story img Loader