विश्वचषकाच्या २०व्या सामन्यात आज इंग्लंडसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकन संघाने अप्रतिम फलंदाजी करत ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी ४०० धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेनची सध्या सर्वत्र चर्चा आहे, हेनरिक क्लासेननं अवघ्या ६१ चेंडूत शतक ठोकले. चर्चेचं कारण शतक आहेच पण कोणत्या परिस्थितीत त्यानं ही खेळी केली याची सर्वात जास्त चर्चा होत आहे.
अवघ्या ६१ चेंडूत ठोकलं शतक
ऑक्टोबर हिटमधील उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. गरम हवा, तापमानात होणारे बदल, आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड, अतिरिक्त दमछाक अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात मुंबईकर अनुभवत आहेत. असं असलं तरीही दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज हेन्रिच क्लासेनने वानखेडे स्टेडियममध्ये रणरणत्या उन्हात दमदार शतकी खेळी केली. क्लासेन दमला मात्र थांबला नाही, त्याच्या शतकाचा व्हिडीओ आयसीसीनंही शेअर केला आहे.
क्लासेनचं मुंबई स्पिरीट
मुंबईचा उकाडा सर्वांनाच सहन होतो असं नाही मात्र हेनरिक क्लासेननं ते करुन दाखवलं. क्लासेन आपल्या शतकी खेळीवेळी सातत्याने खाली बसत होता. त्याला मुंबईतील दमट आणि उष्ण वातावरणाचा प्रचंड त्रास होत होता. तरी त्याने शेवटपर्यंत फलंदाजी केली.
एकीकडे इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँडकडून पराभूत झाला. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर इंग्लंडने आजचा सामना जिंकला तर तो टॉप-४ मध्ये स्थान मिळवेल.