Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात विकासाच्या मुद्यांवर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांत काही महत्वाचे करार देखील करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याच्यानिमित्ताने श्रीलंका क्रिकेट टीमच्या काही माजी खेळाडूंनी त्यांच्याशी संवाद साधला.

श्रीलंकेचा १९९६ च्या विश्वचषक विजेत्या संघातील सनथ जयसूर्या यांनीही कोलंबो येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी इतर प्रमुख खेळाडू देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला असता तेव्हा सनथ जयसुर्या यांनी श्रीलंकेतील जाफना येथे भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधायला मदत करण्यासाठी मोदींकडे साकडं घातलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देखील होकार दर्शवला.

श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षक असलेले ५५ वर्षीय जयसूर्या यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हटलं की, “जाफनामध्ये अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना विनंती केली की ते जाफनामध्ये ही सुविधा बांधण्यास मदत करू शकतील का? त्यावर त्यांनी सांगितलं की ते टीमशी चर्चा करतील आणि लवकरच आमच्याशी संपर्क साधतील.”

सनथ जयसूर्या यांनी पुढे म्हटलं की, “आमच्यासाठी हे करणं खूप कठीण आहे. एक देश म्हणून आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड म्हणून देखील. आम्ही एक प्रणाली तयार करण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही जाफनामध्ये प्रांतीय प्रशिक्षक आणि जिल्हा प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. जाफनामधील अनेक शाळांत देखील क्रिकेट खेळतात. तिथे एक (क्रिकेट) संस्कृती आहे. मात्र, ही परंपरा आणखी पुढे नेण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंशी अधिक संपर्क साधण्याची आवश्यकता आहे. यासाठी आम्हाला भारताची मदत हवी आहे.”

श्रीलंकेतील जाफनाला क्रीडा संदर्भातील पायाभूत सुविधांची आवश्यकता का आहे? यांचं कारण स्पष्ट करताना सनथ जयसूर्या यांनी म्हटलं की, “आमच्याकडे दक्षिणेकडे मैदाने आहेत. कोलंबो, हंबनटोटा, दांबुला, पल्लेकेले, पण उत्तरेकडे नाहीत. लोकांना उत्तर आणि दक्षिणेला जोडण्याची आवश्यकता आहे. ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खेळ. आम्ही बरेच काही करत आहोत. मात्र, जर आपण जाफनामध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधू शकलो तर ते आणखी फायद्याचं ठरेल.”