भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी अर्ज मागवले होते. महिला टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पत्करावी लागलेली हार आणि प्रशिक्षक रमेश पोवार-मिताली राज यांच्यात झालेला वाद यामुळे बीसीसीआयने नव्याने अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्ज हा प्रशिक्षकपदसाठी इच्छुक असल्याचं कळतंय. गिब्जने या पदासाठी आपला अर्ज केला असून त्याला लवकरच मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, असं समजतंय. CricketNext या संकेतस्थळाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अवश्य वाचा – धोनीचा तो निर्णय माझ्यासाठी धक्कादायक ! धोनीच्या रणनितीवर गौतमचं ‘गंभीर’ प्रश्नचिन्ह
हर्षल गिब्जसोबतच, माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोअर, वेंकटेश प्रसाद, रे जेनिंग्ज हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचं बोललं जातंय. मिताली राजसोबत झालेल्या वादानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी रमेश पोवार यांना आपला पाठींबा दर्शवला होता. मात्र पोवारने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे की नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाहीये. कॅरेबियन बेटांवर झालेल्या टी-20 विश्वचषकापर्यंत रमेश पोवार यांची महिला संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आलेली होती.
14 डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवार बीसीसीआयकडे अर्ज करु शकणार आहेत. 20 डिसेंबर रोजी भारताचे माजी खेळाडू कपिल देव आणि अंशुमन गायकवाड यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय हे प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रीयेमध्ये अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोणाला मिळतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.