अश्विनी कासार

मी क्रिकेटवेडी नसले तरी क्रिकेटची निस्सीम चाहती आहे. आपल्याकडे लोक सणासमारंभांना एकत्र येत नाहीत, एवढे क्रिकेट पाहण्यासाठी एकत्र येतात. एकत्र क्रिकेट पाहणे हा एक सोहळा असतो. मी लहान असताना भारताच्या विजयानंतर घरात जल्लोष असायचा आणि आयस्क्रीम पार्टी केली जायची. आजही आमच्याकडे एकत्र येऊन क्रिकेटचे सामने पाहिले जातात. विशेष म्हणजे, लोक रस्त्यावर थांबून, गाडय़ा थांबवून एकमेकांना स्कोअर विचारतात. क्रिकेटसाठी अनोळखी माणसांसोबतही संवाद साधतात आणि हीच क्रिकेटची खरी ताकद आहे, असे मला वाटते. सध्या विश्वचषकाच्या निमित्ताने सगळीकडे क्रिकेटचा माहोल आहे आणि हा माहोल आमच्या सेटवरसुद्धा सुरू आहे. वेळ मिळेल तसे सगळे क्रिकेट खेळत असतात. मग सेटच्या कोपऱ्याला चौकार, बाजूला षटकार, इकडे बाद, तिकडे टप्पा अशी सगळी धम्माल सुरू असते. माझा आवडता खेळाडू आणि सध्याचा समाजमाध्यमांचा कल पाहता, यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीकडून देशाला खूप अपेक्षा आहेत.

(शब्दांकन : भक्ती परब)