जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार जुन-जुलै महिन्याशिवाय भारतीय खेळाडू आता आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरणार नाहीयेत. त्यामुळे सध्या होम क्वारंटाइन झाल्यानंतर सर्व खेळाडूंचे पालक त्यांच्याकडून घरकामं करुन घेताना दिसत आहेत.

भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवर घरातली लादी पुसतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी मदत करतोय आणि माझी आई खुश आहे. फक्त चप्पल घालून लादी पुसल्यामुळे मला हे काम परत करावं लागलं आहे…अशी कॅप्शन लिहीत बुमराहने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

२०१९ वर्षाच्या अखेरीस बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे संघात खेळू शकला नाही. २०२० मध्ये घरच्या मैदानावर खेळत असताना त्याने भारतीय संघात पुनरागमन केलं. मात्र न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत बुमराहला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहला गोलंदाजीत आलेलं अपयश हे भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत २-० ने स्विकाराव्या लागलेल्या पराभवामागचं प्रमुख कारण मानलं जात आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीनंतर बुमराह मैदानात येईल, तेव्हा त्याची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader