एकापाठोपाठ नवनवीन विक्रम रचणारी भारताची उदयोन्मुख धावपटू हिमा दास आता ट्रॅकऐवजी अभ्यास करताना दिसणार आहे. महत्त्वाच्या स्पर्धासाठी तयारी करतानाच तिने आता १२वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.
जागतिक कनिष्ठ गटातील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीचे विजेतेपद पटकावत हिमा दास एका रात्रीत देशातील अव्वल खेळाडू बनली होती. आसाम येथील नागांव तालुक्यातील कंधुलिमारी गावात राहणाऱ्या हिमाने ५०.७९ सेकंद अशी कामगिरी करून राष्ट्रीय विक्रम रचला तसेच आशियाई स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अॅथलीट म्हणून कारकीर्द घडवत असतानाच शिक्षणाचे महत्त्वही तिला उमगले आहे. त्यामुळेच आसाम उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या १२वीच्या परीक्षेच्या अभ्यासात ती व्यग्र आहे.
‘‘२०१९ मध्ये मी काही स्पर्धावर लक्ष केंद्रित केले आहे, मात्र संपूर्ण वेळ सरावात न घालवता मी थोडा वेळ अभ्यासासाठीही राखून ठेवत आहे. वेळापत्रकानुसारच मी अभ्यास करत आहे,’’ असे हिमा दासने सांगितले.
पुढील महिन्यात फेडरेशन चषक राष्ट्रीय स्पर्धेद्वारे अॅथलेटिक्सच्या मोसमाला सुरुवात होणार असून २१ एप्रिलपासून होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी १५ ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. मात्र मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत तिची परीक्षा सुरू राहणार आहे, याबद्दल ती म्हणाली, ‘‘राष्ट्रीय स्पर्धेआधीच परीक्षा संपणार असल्यामुळे मला कोणतीही अडचण जाणवणार नाही. राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे.’’