|| तुषार वैती
विश्वचषकातील भारतीय क्रिकेट संघाचे अपयश चाहत्यांना विसरायला लावणाऱ्या दोन घटना म्हणजे इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील चित्तथरारक पद्धतीने ‘टाय’ झालेला अंतिम सामना आणि हिमा दासची सुवर्णपदकांची लयलूट. विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना हिमाने सुवर्णपदकांचा धडाका लावला होता; पण प्रसारमाध्यमांनी हिमाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. उपांत्य फेरीत गारद होणाऱ्या भारतीय संघावर टीकेचा भडिमार करणाऱ्या चाहत्यांनी हिमाला समाजमाध्यमांवर अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. १९ दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पाच सुवर्णपदके जिंकणे, ही किमया आतापर्यंत कुणाही भारतीय अॅथलेटिक्सपटूला साधता आली नाही; पण हिमाचे हे यश खरोखरच अव्वल दर्जाचे आहे का? तर नक्कीच नाही.
देशात क्रीडासंस्कृती फारशी रुजली नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या ताऱ्यालाही क्षणार्धात ध्रुवतारा बनवले जाते. क्रिकेटवेडय़ा भारतात अन्य खेळांचे मूल्यमापनच केले जात नाही. हिमाचे यश गौरवास्पद असले तरी त्याकडे स्पर्धात्मक वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. हिमा ज्या पाच स्पर्धामध्ये सहभागी झाली, त्या स्पर्धाचे महत्त्व, दर्जा, सहभागी होणारे खेळाडू, त्या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या (आयएएएफ) आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ‘ए’ ते ‘एफ’ या श्रेणीत मोडतात. हिमा सहभागी झालेल्या पाचपैकी फक्त तीन स्पर्धानाच ‘आयएएएफ’ची मान्यता होती. म्हणजेच ‘ई’ किंवा ‘एफ’ श्रेणीत मोडणाऱ्या या स्पर्धा म्हणजे आपल्याकडील राष्ट्रीय स्पर्धेपेक्षा थोडय़ा वरच्या दर्जाच्या.
युरोप आणि आफ्रिकन देशांमधील अव्वल धावपटू आपली कामगिरी सुधारण्यासाठी कडवी चुरस असणाऱ्या स्पर्धाना महत्त्व देतात. त्यामुळे अन्य देशांतील उरलेसुरलेले धावपटू तुलनेने कमी स्पर्धात्मक दर्जा असलेल्या स्पर्धाची निवड करतात. भारतीय धावपटूंच्या वाटय़ालाही अशाच प्रकारच्या दुय्यम दर्जाच्या स्पर्धा येतात. एप्रिल महिन्यात झालेल्या दोहा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत हिमा पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती. त्यामुळे तिचे स्पर्धात्मक पुनरागमन कसे करायचे, हा प्रश्न हिमाच्या प्रशिक्षकांना होता. म्हणूनच २०० मीटर शर्यतींमध्ये फारशी सहभागी न होणाऱ्या हिमावर अतिरिक्त जबाबदारी सोपवायची, याच उद्देशाने तिला याच गटाच्या पहिल्या चार स्पर्धासाठी उतरवण्यात आले. या चारही स्पर्धामध्ये हिमाची कामगिरी २३.६५ सेकंद, २३.९७ सेकंद, २३.४३ सेकंद आणि २३.२५ सेकंद अशी होती. जगाच्या धावपटूंमध्ये तुलना करायची झाल्यास, तिची २३.२५ ही सर्वोत्तम कामगिरी या वर्षांत १२८व्या क्रमांकावर जाते. या चारही स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या २० प्रतिस्पध्र्याची कामगिरी ही हिमाच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आसपासही नाही. अनेक प्रतिस्पध्र्याचा ‘आयएएफएफ’च्या संकेतस्थळावर नामोल्लेखही नाही.
४०० मीटर हा हिमाचा सर्वात आवडता प्रकार. चेक प्रजासत्ताकमधील नोव्ह मेस्टो स्पर्धेत ५२.०९ सेकंद अशी कामगिरी करत हिमाने पाचवे सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या पहिल्या १० जणींमध्ये सात खेळाडू भारताच्या होत्या. त्यात हिमा वरचढ ठरली एवढेच. जर सर्व खेळाडू भारताच्याच होत्या तर भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघ खेळाडूंच्या युरोपवारीवर एवढा खर्च करण्यापेक्षा त्यांच्यात भारतात स्पर्धा का भरवत नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. ‘साइ’ आणि राष्ट्रीय संघटनेने याचे उत्तर देण्याची गरज आहे.
पाचही सुवर्णपदकांनंतर हिमाला अद्याप दोहा येथील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र होता आले नाही. या स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता २०० मीटरसाठी २३.०२ सेकंद आणि ४०० मीटरसाठी ५१.८० सेकंद असे निकष आहेत; पण हिमाची सर्वोत्तम कामगिरी आणि पात्रता निकषांमध्ये बरेच अंतर आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत हिमाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. ऑलिम्पिकसाठी हे निकष अधिकच कठीण होणार आहेत.
या सुवर्णपदकांमुळे हिमाचा आत्मविश्वास उंचावला असून तिला चांगली कामगिरी करण्याचे बळ मिळाले आहे. पी. टी. उषा, मिल्खा सिंग यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी हिमाच्या रूपाने देशवासीयांना अॅथलेटिक्समध्ये पदकाची आशा दिसू लागली आहे. गरुडभरारी घेण्यासाठी हिमाला योग्य वेळी प्रोत्साहन मिळाले तरच तिच्याकडून जागतिक आणि ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहता येईल.
कोणत्याही स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू कसून तयारी करत असतात. त्यांच्यासमोर कोणता प्रतिस्पर्धी उभा राहणार, याची चिंता धावपटूंना नसते. त्याचबरोबर कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचे, याचा निर्णय खेळाडूंनी घेतलेला नसतो. तो मैदानात झोकून देण्यासाठी सज्ज झालेला असतो. त्यामुळे स्पर्धेच्या दर्जाने किती उंची गाठली आहे, हे खेळाडूंच्या ध्यानीमनी नसते. हिमाने खूपच चांगली कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. आगामी स्पर्धामध्ये तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. जर स्पर्धेचा दर्जा खालच्या स्तरावरचा असता आणि हिमाला सुवर्णपदक जिंकता आले नसते तरी तिच्यावर टीका झाली असती. वयाच्या २०व्या वर्षी हिमाने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे या हिमाच्या या यशात तिला पाठिंबा देणे गरजेचे आहे. – रचिता मिस्त्री, भारताची माजी धावपटू