BCCI on Sarfaraz khan: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय कसोटी संघातून सरफराज खानला वगळण्यात आल्याने सुनील गावसकर सारख्या माजी दिग्गजांनी टीका केली. मात्र, बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) मधील एका सूत्राने दावा केला की मुंबईच्या या फलंदाजाचा खराब फिटनेस हे या निर्णयामागील कारण आहे. तसेच त्याच्यात शिस्तीचा अभाव हे सर्वात मोठे कारण आहे. उजव्या हाताचा फलंदाज सरफराजने रणजी ट्रॉफीच्या मागील तीन हंगामात २५६६ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत ३७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७९.६५च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने अंडर-१९ विश्वचषकात दोन वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले असून अशा खेळाडूला संघात स्थान न दिल्याने प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ऋतुराज गायकवाडची संघात निवड झाली आहे ज्याची प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील सरासरी ४२च्या जवळपास आहे. संघ निवडीशी संबंधित असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “अशा संतप्त प्रतिक्रिया समजण्यासारख्या आहेत पण मी तुम्हाला सांगू शकतो की सरफराजला वारंवार बाजूला ठेवण्याचे कारण फक्त क्रिकेट नाही. त्याची निवड न होण्याची अनेक कारणे आहेत.”
सरफराजचा फिटनेस खराब आहे
“सलग दोन मोसमात ९०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने निवडकर्ते बेफिकीर आहेत का?” असा सवाल सरफराजला पाठिंबा देणाऱ्या गावसकरांनी केला. यावर बीसीसीआय एक अधिकारी म्हणाला की, “त्याची संघात निवड न होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे त्याचा फिटनेस, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही.” तो पुढे म्हणाला, “सरफराजला या बाबतीत खूप मेहनत करावी लागेल आणि वजन कमी करावे लागेल. त्याला त्याच्या अधिक फिटनेसबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे तरच तो भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. केवळ त्याचा फिटनेस हाच निवडीचा निकष नाही पण बाकीची अशी बरीच कारणे आहेत ज्यावर त्याला काम करावे लागेल.”
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “तंदुरुस्तीसोबतच सरफराजचा मैदानाच्या आत आणि बाहेरील वावरही शिस्तीच्या निकषांवर बसला नाही. फक्त धावा केल्याने काही होत नाही आपले वर्तन देखील तितकेच महत्वाचे असते. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याचे वागणे हे सर्वांनाच खटकले आहे. त्याचे काही शब्द आणि हावभाव बीसीसीआयच्या शिस्तीच्या निकषात बसले नाही. त्याच्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन हा वेगळा आहे त्यात त्याने बदल करावा. सरफराज, त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांच्यासोबत त्याने पैलूंवर काम करण्याची गरज आहे.”
मैदानावर सेलिब्रेशन करण्याची वाईट पद्धत
या वर्षी दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात शतक झळकावल्यानंतर सरफराजने केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनने निवड समितीचे लक्ष वेधून घेतल्याचे मानले जात आहे. त्यावेळी निवड समितीचे तत्कालीन प्रमुख चेतन शर्मा स्टेडियमवर उपस्थित होते. यापूर्वी, २०२२ रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान त्याच्या वागण्याने मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आणि मुंबईचे माजी दिग्गज चंद्रकांत पंडित नाराज झाले होते. आयपीएलमधील त्याची खराब कामगिरी आणि शॉट बॉलसमोरील त्याची कमजोरी यामुळे त्यांना असा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे का, असा प्रश्न अधिकाऱ्याला विचारण्यात आला.
“ही माध्यमांनी निर्माण केलेली चर्चा आहे. जेव्हा मयंक अग्रवालने भारतीय कसोटी संघात प्रवेश केला तेव्हा त्याने एकाच मोसमात सुमारे १००० प्रथम श्रेणी धावा केल्या होत्या. एम.एस.के प्रसाद यांच्या समितीने त्यांचा आयपीएल रेकॉर्ड पाहिला का? हनुमा विहारीच्या बाबतीतही असेच होते. देशांतर्गत क्रिकेट खेळून तो राष्ट्रीय संघातही आला. जेव्हा त्याच्या आयपीएल विक्रमाचा भारतीय संघात निवड करताना विचार केला गेला नाही, तेव्हा सरफराजच्या बाबतीत असे का होईल? गायकवाड याच्यासोबतच सूर्यकुमार यादवही संघातील दावेदार असून श्रेयस अय्यर दुखापतीतून बरा झाल्यावर तो सुद्धा संघात पुनरागमन करेल. त्यामुळे सरफराजला आता संघात स्थान मिळवणे अधिक कठीण जाईल”,असे तो बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.