करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्त्य केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बंदीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं. या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवरची बंदी उठवली, यानंतर हार्दिक पांड्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात पदार्पणही केलं. या सामन्यात हार्दिकने दोन बळी घेत केन विल्यमसनचा एक उत्कृष्ट झेलही पकडला. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीनेही हार्दिक पांड्याच्या खेळाचं कौतुक केलं आहे. तो प्रसंग हार्दिक पांड्याची कारकिर्द एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा आत्मविश्वास विराटने व्यक्त केला.

“आयुष्यात अशा खडतर प्रसंगाशी सामना करण्यासाठी तुमच्यासमोर दोन पर्याय असतात. एकतर तुम्ही त्या प्रसंगामुळे खचून जाता किंवा त्यामधून काहीतरी धडा शिकून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करता. एका क्रिकेटपटूसाठी त्याच्या खेळापेक्षा काही प्रिय नसतं. तुम्ही खेळासाठी सर्वस्व झोकून देता, तुम्ही खेळाप्रती आदर दाखवलात तर त्याची फळ तुम्हाला नक्की मिळतात. तुम्हाला यासाठी अधिक काहीही करण्याची गरज नसते. या घटनेनंतर हार्दिक पांड्याची कारकिर्द एका वेगळ्या उंचीवर जाईल याची मला खात्री आहे.” पत्रकार परिषदेत विराट कोहली हार्दिक पांड्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाबद्दल बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs NZ : Flying Pandya ! हार्दिकचा हा थरारक झेल पाहिलात का??

यापुढे तो योग्य रस्ता पकडेल आणि अजुन चांगला क्रिकेटपटू होईल, अशी आपल्याला खात्री असल्याचंही विराटने म्हटलंय. तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : पांड्याच्या पुनरागमनामुळे भारताचा संघ परिपूर्ण – सुनील गावसकर

Story img Loader