भारतीय स्क्वॉशपटूंनी आशियाई क्रीडा स्पध्रेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिताना दोन पदकांची निश्चिती केली आहे. मागील दोन आशियाई स्पध्रेत भारताची स्क्वॉशमधील वाटचाल कांस्यपदकापर्यंत मर्यादित राहिली होती, परंतु यंदा प्रथमच भारताचे खेळाडू त्याहून मोठी भरारी घेण्याच्या बेतात आहेत. माजी विजेत्या ओंग बेंग ही याला नमवून सौरव घोषाल हा आशियाई स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्यामुळे घोषालने आपले रौप्यपदक निश्चित केले आहे.
येओरूमल स्क्वॉश कोर्टावर अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या घोषालने क्रमवारीत ३५व्या स्थानावर असलेल्या मलेशियाच्या बेंग ही याचा ११-९, ११-४, ११-५ असा फक्त ४५ मिनिटांत सहज पराभव केला. मागील दोनदा झालेल्या या प्रतिस्पध्र्यातील लढतींपैकी पीएसए व्यावसायिक टूर स्पध्रेत घोषाल विजयी झाला होता, तर जूनमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेच्या सांघिक उपांत्य फेरीत बेंग जिंकला होता.
३४ वर्षीय बेंगविरुद्धच्या सामन्यात घोषालचे पारडे जड होते. २००२च्या बुसान आणि २००६च्या दोहा आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या बेंगला २०१०च्या गुआंगझाऊ स्पध्रेत कांस्यपदक मिळाले होते. परंतु यंदा त्याचे पदकाचे स्वप्न घोषालने उद्ध्वस्त काढले. भारताला सुवर्णपदक जिंकण्याची यंदा चांगली संधी आहे, असे घोषालने आधीच सांगितले होते. आता मॅक्स ली (हाँगकाँग) आणि अब्दुल्ला अल्मेझायेन (कुवेत) यांच्यातील उपांत्य लढतीमध्ये विजयी होणाऱ्या खेळाडूविरुद्ध घोषाल अंतिम फेरीत झुंजणार आहेत.

गेल्या तीन दिवसांमध्ये मी तीन दिग्गज खेळाडूंना हरवले आहे. रविवारी क्रीडानगरीत परतल्यावर उपांत्य फेरीच्या सामन्याचा गांभीर्याने विचार केला. सुवर्णपदक मिळाल्यास माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असेल. परंतु मी पदकापेक्षा सामन्याकडे लक्ष केंद्रित करतो.
-सौरव घोषाल

Story img Loader