फुटबॉल इथून-तिथून टोलवताना आपण सारेच बघतो, पण या फुटबॉलचा उगम, त्यामध्ये झालेले बदल, त्याच्या नवनवीन आवृत्त्या, सारे काही थक्क करणारे आहे. प्राचीन काळी फुटबॉल पहिल्यांदा आला कोठून, याचे उल्लेख आढळत नाहीत. साधारण ३००० वर्षांपूर्वी वगैरे फुटबॉल पहिल्यांदा बनवला गेला, तेव्हा तो प्राण्यांच्या कातडीचा होता. त्यानंतर फुटबॉलमध्ये प्राण्यांचे अवयवही वापरले, बियाही वापरण्यात आला. पुढे कधीतरी रबराचा फुटबॉल बनवला गेला, खेळालाही गती आली आणि फुटबॉलमध्ये हवाही आली. सध्याच्या फुटबॉलचे तंत्र हे फारच विकसित आहे. यंदाच्या फुटबॉलचे नाव ‘ब्राझुका’ ठेवण्यात आले असून त्यामध्ये कॅमेरे आहेत. सुरुवातीचा आकार नसलेला आणि आत्ताचा काटेकोर पद्धतीने बनवलेला ब्राझुकापर्यंतचा हा प्रवास.
प्राचीन फुटबॉल
साधारण ३००० हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये पहिला फुटबॉल पाहिला गेल्याचे सांगितले जाते. तो प्राण्यांच्या कातडीपासून बनविण्यात आला होता. इजिप्तमधल्या लोकांनी कापडामध्ये विविध बिया भरून सुरुवातीला फुटबॉल बनवला. कालांतराने बियांऐवजी केसांचा वापर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी रबरापासून फुटबॉल बनवला. मध्य अमेरिकेमध्ये ‘रेड इंडियन्स’नीही रबरापासून फुटबॉल बनवला.
मध्ययुगीन फुटबॉल
मध्य युगामध्ये, म्हणजे साधारणत: ४५० वर्षांपूर्वी या खेळाला चांगलीच गती मिळाली. या वेळी डुकराच्या मूत्रपिंडाचा वापर फुटबॉलसाठी केला जाऊ लागला. डुकराच्या मूत्रपिंडाला कातडय़ाने गुंडाळण्यात आले होते. १६००मध्ये युरोपमध्ये असे फुटबॉल मोठय़ा प्रमाणात वापरण्यात येत होते, कालांतराने यामध्येही समस्या जाणवू लागली. डुकराच्या मूत्रपिंडातील हवा कमी झाल्यावर चेंडूची दिशा बदलू लागली. त्यामुळे त्यासाठी कातडय़ाटा अधिकाधिक वापर करण्यात सुरुवात झाली.
आधुनिक काळातील व्यावसायिकता
आधुनिक काळात खेळाला व्यावसायिक वलय प्राप्त झाले आणि त्यानुसार फुटबॉलमध्येही बदल होत गेले. चार्ल्स गुडइयर यांना आधुनिक फुटबॉलचे निर्माते मानले जाते. चार्ल्स यांनी १९८८ साली रबराचा पहिला गोल फुटबॉल बनवला. चार्ल्स यांनी फुटबॉलचा बारकाईने अभ्यास करत त्यामधील त्रुटी दूर केल्या आणि फुटबॉलला व्यावसायिक बनवले. १८७२ साली फुटबॉलचा आकार आणि वजन ठरवण्यात आले. फुटबॉलचे आकारमान २७-२८ इंचाच्या घरात असावे, असे ठरवण्यात आले आणि त्यामध्ये आजतागायत कोणताही बदल झालेला नाही. १९३०मध्ये फुटबॉलमध्ये थोडा बदल करून कातडय़ाचा वापर पुन्हा एकदा करण्यात आला, पण फुटबॉल पाण्यामध्ये भिजल्यावर जड व्हायला लागला आणि १९५०मध्ये पहिला ‘वॉटरप्रूफ’ फुटबॉल बनवण्यात आला. या वेळी फुटबॉलला रंगही देण्यात आला.
आजचा फुटबॉल
१९७० साली आदिदास या कंपनीने फुटबॉल बनवायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यामध्ये पांढरा व काळा हे दोनच रंग वापरले. या वेळी सरळ गोलाकार फुटबॉल बनवण्यापेक्षा आदिदास कंपनीने ३२ निरनिराळे भाग केले आणि ते जोडत फुटबॉल बनवायला सुरुवात केली. यामध्ये २० पांढरे आणि १२ काळ्या रंगाचे भाग होते. या फुटबॉलला ‘टेलस्टार’ हे नाव दिले आणि १९७४ च्या विश्वचषकामध्ये या फुटबॉलचा वापर करण्यात आला. २००६ सालापर्यंत हाच फुटबॉल वापरला गेला, पण २००६ साली विश्वचषकामध्ये १४ भागांच्या साहाय्याने फुटबॉल बनवला गेला. २०१०च्या विश्वचषकासाठी खास फुटबॉल बनवण्यात आला आणि त्याला ‘जबुलानी’ नाव देण्यात आले, जो आठ भागांपासून बनवला होता.
ब्राझील विश्वचषकातील टेक्नोबॉल
तंत्रज्ञानाचा फायदा फुटबॉललाही चांगलाच झाला आणि या वेळी फुटबॉलमध्ये चक्क कॅमेरा बसवण्यात आला आहे. या चेंडूला अंतर्गतच सहा एचडी दर्जाचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या चेंडूमध्ये अनोख्या समतल सहा पॅनेलचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे चेंडूवर ताबा मिळवणे, पकड, स्थिरता आणि हवेतील हालचालींमध्ये अचूकता असणार आहे. ब्राझुका चेंडूतील कॅमेऱ्याला ब्राझुकॅम असे नाव देण्यात आले आहे. या चेंडूतील कॅमेऱ्यांमध्ये चित्र काढण्याबरोबरच त्याच्यावर योग्य प्रक्रियाही केली जाणार आहे. सहा पंख्यांच्या पॉल्युरेथेन पॅनेलच्या घट्ट समीकरणाने हा चेंडू बनला आहे. चेंडू हवेत स्थिर राहावा यासाठी खास प्रयत्न करण्यात आले आहेत. अडीच वर्षे सहाशेहून अधिक खेळाडू आणि १० देशांच्या ३० विविध संघांद्वारे ब्राझुकाची चाचणी घेण्यात आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चाचणी झालेला आणि जगातील कोणत्याही वातावरणात व्यवस्थित राहणारा हा एकमेव चेंडू आहे. या चेंडूचे वजन ४३७ ग्रॅम असून, त्याची हवा शोषून घेण्याची क्षमता ०.२ टक्के असणार आहे. त्यामुळे आकार आणि वजन पावसातही समान राहणार आहे. यामुळे चेंडू ज्या ठिकाणी जाईल, त्याप्रमाणे त्याचा प्रवास चाहत्यांना टिपता येणार आहे. ब्राझुका नावाचे हे चेंडू निळ्या, नारिंगी आणि हिरव्या रंगात असणार आहेत. फुटबॉलशी निगडित जल्लोषी आणि उत्साही वातावरणाचे प्रतीक म्हणून या रंगांची निवड करण्यात आली आहे.
फुटबॉलच्या पाऊलखुणा
फुटबॉल इथून-तिथून टोलवताना आपण सारेच बघतो, पण या फुटबॉलचा उगम, त्यामध्ये झालेले बदल, त्याच्या नवनवीन आवृत्त्या, सारे काही थक्क करणारे आहे.
आणखी वाचा
First published on: 07-06-2014 at 05:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of football