वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वजनी गट बदलल्यानंतरही राष्ट्रीय विजेत्या हितेशने (७० किलो) सर्वोत्तम तंत्रासह खेळ करताना विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जागतिक बॉक्सिंगच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा हितेश पहिला भारतीय बॉक्सिंगपटू ठरला. त्यामुळे त्याचे पदकही निश्चित झाले आहे.
ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हितेशने परिपूर्ण तंत्र आणि कौशल्यासह फ्रान्सच्या माकन ट्राओरेवर एकतर्फी वर्चस्व राखत विजय मिळविला. हितेशने ऑलिम्पिकपटू ट्राओरेविरुद्ध सावध पवित्रा घेतला होता. तुलनेत ट्राओरे सुरुवातीपासून कमालीचा आक्रमक खेळला. यामुळे हितेशला खेळाच्या वेगावर नियंत्रण राखणे शक्य झाले. तिसऱ्या आणि पाचव्या फेरीत त्याला पेनल्टी गुणांचा फायदा झाला. हितेशचे तंत्र आणि नियोजन इतके अचूक होते की पाचही फेऱ्यांत त्याने एकदाही ट्राओरेचे पंचेस थेट शरीरावर बसणार नाहीत याची काळजी घेतली. यामुळेच चार फेऱ्यांतील निकाल २८-२८ असा बरोबरीत राहूनही पंचांचा कौल हितेशच्या बाजूने राहिला. अखेरच्या फेरीत हितेशने वर्चस्व राखत २९-२७ असा विजय मिळविला. विजेतेपदासाठी आता त्याची गाठ इंग्लंडच्या ओडेल कामराशी पडणार आहे.
उपांत्य फेरीत भारताच्या अन्य तीन बॉक्सिंगपटूंना मात्र अपयश आले. अपेक्षा उंचावलेल्या जदुमणी सिंहला उझबेकिस्तानच्या माजी आशियाई विजेत्या असिबेक जालीलोवकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. विशालला उझबेकिस्तानच्याच तुराबेक खाबीबुलाएवकडून ९० किलो, तर सचिनला पोलंडच्या पावेल ब्रॅशकडून ६० किलो वजनी गटात एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला.