मुंबईकर रोहित शर्माने काल मोहालीच्या मैदानात पराक्रम केला. रोहितची फटकेबाजी आणि तिसऱ्यांदा द्विशतक झळकवण्याचा पराक्रम पाहून मैदानातील जवळजवळ प्रत्येक भारतीय प्रेक्षक आनंद साजरा करत होता. यावेळी एक श्रीलंकन चाहताही प्रचंड आनंदात होता. हा चाहता त्यावेळी मैदानात उपस्थित नव्हता. रोहितने या व्यक्तीला त्याच्या कठीण काळात खूप मदत केली. त्यामुळे ही व्यक्ती रोहित शर्माची
पण या लंकन चाहत्याने रोहितचा विक्रम साजरा कऱण्याचे एक खास कारण आहे ते म्हणजे रोहितने त्याला गरजेच्या वेळी केलेली मदत.
मोहम्मद निलम असे या श्रीलंकेच्या चाहत्याचे नाव आहे. सुधीर चौधरी जसा भारतीय संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी संघाबरोबर जगभर फिरत असतो तसाच मोहम्मदही श्रीलंकन संघाचा खूप मोठा चाहता असून तोही संघाच्या जवळजवळ प्रत्येक सामन्याला हजेरी लावतो. श्रीलंकन संघ भारतामध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी दाखल झाल्यानंतर मोहम्मदही भारतात आपल्या संघाची पाठराखण करण्यासाठी दाखल झाला. मात्र, त्याच्या बाबांना घशाचा कॅन्सर झाला असून त्यांच्यावर त्वरीत उपचार करावे लागतील, असा फोन त्याला अचानकपणे आला. मात्र, लंकन संघाच्या दौऱ्यानुसार नियोजन केल्यामुळे मोहम्मदकडे श्रीलंकेला त्वरीत परत जाण्यासाठी विमानाच्या तिकीटाचे पैसे नव्हते. त्याने ही आपली अडचण भारतीय क्रिकेट चाहता सुधीर चौधरीला सांगितली. हा सर्व प्रकार घडला तो भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकत्ता येथे झालेल्या कसोटी सामन्याच्यावेळी घडला. रोहितला हा प्रकार समजताच त्याने लगेच सुधीरकडे मोहम्मदला तिकीट बुक करण्यासाठी लागणारी रक्कम दिली. त्यामुळेच मोहम्मद वेळीच स्वत:च्या वडिलांची काळजी घेण्यासाठी पोहचू शकता.
रोहितने अशी अचानक मदत केल्याने मोहम्मदलाही सुखद धक्काच बसला. याबद्दल ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना तो म्हणाला, ‘रोहितने केलेल्या मदतीसाठी मी त्याला खूप आभारी आहे. तो खूप चांगला खेळाडू तर आहेच पण तितकाच चांगला माणूसही आहे. आमच्या संघाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील त्याची नाबाद २०८ धावांची खेळी पाहून मला खूप आनंद झाला आहे’
मोहम्मदच्या वडिलांची तब्येत शस्त्रक्रियेनंतर सुधारत असल्याने तो सध्या निश्चिंत आहे. सध्या तो श्रीलंकेमध्येच आपल्या वडिलांची काळजी घेत असून टीव्हीवरून भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचा आनंद घेत आहे.
विराटलाही काळजी
मोहम्मदच्या वडिलांची काळजी केवळ रोहितलाच नसून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलाही असल्याचे दिसून आले. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामधून सुट्टी घेऊन आपली प्रेयसी अनुष्का शर्माबरोबर लग्न करण्यासाठी ईटलीला गेलेला विराट कोहली लग्नसमारंभात व्यस्त असताना मोहम्मदच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत होता. तसेच काही आर्थिक मदत हवी असल्यास कळवावे, असेही त्याने मोहम्मदला सांगितले.