नेदरलँडच्या ब्रेडा शहरात सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे यंदाचं अखेरचं वर्ष आहे, त्यामुळे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण भारतासाठी महत्वाचं बनलं होतं. मात्र निर्धारित वेळेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली त्यामुळे सामना पेनल्टी शुटआऊटवर गेला. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतावर ३-१ अशी मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. ऑस्ट्रेलियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे १५ वं विजेतेपद ठरलं, भारताला मात्र इतिहासात एकदाही या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

नेदरलँडविरुद्ध सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं होतं. त्यानूसार अंतिम फेरीत खेळताना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध काही नवीन रणनिती आखल्या होत्या. मात्र दुर्दैवाने त्यांच्या या रणनिती सामन्यात सफल ठरल्या नाहीत. पहिल्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या दोन संधी भारतासमोर आल्या होत्या. मात्र व्हेरिएशन्स करण्याच्या प्रयत्नात भारताने या दोन्ही संधींवर पाणी सोडलं. अंतिम फेरीत खेळताना आज भारताची आघाडीची फळी लयीमध्ये दिसत नव्हती. एस. व्ही. सुनीलने रचलेल्या अनेक चाली आज आघाडीच्या फळीतील खेळाडूंमध्ये ताळमेळ नसल्यामुळे वाया गेल्या. दुसऱ्या बाजूने मनदीप सिंहने संपूर्ण सामनाभर ऑस्ट्रेलियाचं आक्रमण भेदण्याचा प्रयत्न केला, मात्र ऑस्ट्रेलियन गोलकिपर टायलर लोवेलने मनदीपने सर्व प्रयत्न हाणून पाडले.

सामन्यातली गोलकोंडी फोडण्यासाठी पहिला मान ऑस्ट्रेलियाने पटकावला. गोवर्सने पेनल्टी कॉर्नवर गोल करुन ऑस्ट्रेलियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर कित्येक वेळासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्याकडे ही आघाडी कायम राखली होती. मात्र पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याच्या संधीचा फायदा होत नसल्याने भारतीय खेळाडूंनी मैदानी गोल करण्यावर भर दिला. अखेर तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी शॉर्ट पासवर चाली रचत टायलर लोवेलचा बचाव भेदला. विवेक सादर प्रसादने भारतीय खेळाडूंनी रचलेल्या चालीला सुरेख फिनीशींग टच देत चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. यानंतर संपूर्ण चौथ सत्र भारताने यशस्वीपणे बचाव करत सामना निर्धारीत वेळेत १-१ असा बरोबरीत राखला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी –

याआधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी शूटआऊटवर पराभव स्विकारावा लागला होता. त्याच इतिहासाची आज नेदरलँडमध्ये पुनरावृत्ती झाली. ऑस्ट्रेलियाने आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलच श्रीजेशचा बचाव भेदून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र भारताकडून सरदार सिंह, मनदीप सिंह आणि ललित उपाध्याय या खेळाडूंनी पहिल्या ३ संधींमध्ये गोल करता आला नाही. भारताकडून मनप्रीत सिंहने एकमेव गोल झळकावला, मात्र तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने आपल्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं.

Story img Loader