हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाला पराभवाचा पहिला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतावर ३-२ ने मात केली आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं, मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाचा बचाव भेदण्याचं काम भारतीय खेळाडूंना जमलं नाही.

आक्रमक सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राच्या सहाव्या मिनीटाला गोल करुन आपल्या संघाचं खातं उघडलं. भारताला पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधण्याची चांगली संधी आली होती. मात्र मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करणं भारतीय ड्रॅगफ्लिकर्सना जमलं नाही. मात्र वरुण कुमारने ११ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन भारताला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली. पाठोपाठ पहिल्या सत्राच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या ग्रेगने गोल करुन संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रानंतर दोन्ही खेळाडूंनी आपल्या आक्रमणाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर आक्रमण करत भारतीय संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय मात्र पी. आर. श्रीजेशने ऑस्ट्रेलियाची सर्व आक्रमण परतावून लावली. अखेर तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या मिटनने गोल करत संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला थोडा अवधी शिल्लक असताना हरमनप्रीत सिंहने ५८ व्या मिनीटाला गोल करुन ऑस्ट्रेलियाची आघाडी ३-२ अशी कमी केली. उरलेल्या एका मिनीटात भारताने सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले.

Story img Loader