भारताने चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी धडाकेबाज प्रारंभ केला. एक गोलने पिछाडीवर असूनही जिगरबाज खेळ करीत त्यांनी इंग्लंडवर ३-१ अशी मात केली.
अनेक नवोदित खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताने १४व्या मिनिटाला गोल स्वीकारला. इंग्लंडच्या रिचर्ड स्मिथ याने संघाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करीत हा गोल केला. तथापि, २२व्या मिनिटाला भारताच्या दानिश मुस्तफा याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. युवराज वाल्मीकी याने ३८व्या मिनिटाला आणखी एक मैदानी गोल केला व भारताला २-१ असे अधिक्य मिळवून दिले. ६६व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करीत गुरविंदरसिंग चंडी याने संघाचा तिसरा गोल नोंदविला.
लंडन ऑलिम्पिकमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पहिलीच महत्त्वाची स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाने येथे बहारदार खेळ केला. इंग्लंडने या स्पर्धेसाठी नवोदित व युवा खेळाडूंचा संघ उतरविला आहे. त्यांनी अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यांच्याविरुद्ध खेळताना सुरुवातीला भारतीय खेळाडूंना त्यांच्या चालींचा अंदाज आला नाही. १४व्या मिनिटाला इंग्लंडने जोरदार चाल केली व पेनल्टी कॉर्नरची संधी प्राप्त केली. त्याचा फायदा घेत स्मिथ याने सुरेख फटका मारून संघाचे खाते उघडले. पुन्हा त्यांना २१व्या मिनिटाला गोल करण्याची सुवर्णसंधी लाभली होती. मात्र त्यांच्या डेव्हिड कोनडोन याने मारलेला चेंडू गोलपोस्टजवळून गेला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला भारताच्या दानेश मुस्तफा याने अप्रतिम चाल करीत गोल केला. २६व्या मिनिटाला भारताच्या व्ही.आर.रघुनाथ याने गोल करण्याची संधी वाया घालविली. हा गोल झाल्यानंतर भारताच्या आक्रमणाची धार वाढली. वाल्मीकी याने ३८व्या मिनिटाला इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्ज पिनेर याला चकवित गोल केला. ४४व्या मिनिटाला चंडी याने मारलेला फटका गोलरक्षक जॉर्जच्या हाताला लागून गोलपोस्टबाहेर गेला.
भारताकडे २-१ अशी बराच वेळ आघाडी होती. पी.आर.श्रीजेश हा भारताचा गोलरक्षक नाइन-अ-साइड स्पर्धेत जखमी झाल्यामुळे त्याच्याऐवजी टी. आर. पोटुनुरी याच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी आली आहे. त्याने या सामन्यातील उत्तरार्धात अनेक चाली रोखल्या. ६६व्या मिनिटाला भारतास पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्यावर चंडी याने कोणतीही चूक न करता गोल चढविला.
भारताला रविवारी न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, न्यूझीलंडला शनिवारी जर्मनीकडून २-३ अशी हार पत्करावी लागली आणि यजमान ऑस्ट्रेलियाने बेल्जियम संघावर ४-२ अशी मात केली.

Story img Loader