गेल्या १० वर्षांतील कामगिरी ध्यानात घेतल्यास राष्ट्रीय खेळ असलेल्या भारताची हॉकी रसातळाला पोहोचली आहे, अशी टीका सातत्याने होत होती. गेल्या चार वर्षांत भारताने खेळाच्या शैलीत बदल केला, चार परदेशी प्रशिक्षक बदलून पाहिले. पण भारतीय संघाची घसरण कायम राहिली. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतावर गेल्या ८० वर्षांत पहिल्यांदाच अपात्रतेची नामुष्की ओढवली. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला अखेरच्या क्षणी मायदेशात झालेल्या स्पर्धेद्वारेच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवता आले. पण २०१४ च्या भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास प्रत्येक हॉकीचाहत्यांच्या तोंडातून ‘चक दे इंडिया’ असेच गौरवोद्गार निघतील. १६ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची करामत करणाऱ्या भारताने राष्ट्रकुलमध्ये रौप्य आणि जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची करामत करून दाखवली. इतकेच नव्हे तर चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेतही दिग्गज संघांना धूळ चारत भारताने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मात्र भारताच्या या सुरेख कामगिरीवर प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने गालबोट लागले.
मोसमाची निराशाजनक सुरुवात
गेल्या वर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी नेदरलँड्स दौऱ्यावर गेला. मात्र नेदरलँड्सकडून चारीमुंडय़ा चीत व्हावे लागल्यामुळे भारतीय हॉकीपटूंचे आणखी मानसिक खच्चीकरण झाले. विश्वचषक स्पर्धेत टेरी वॉल्श यांनी भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर तसेच प्राथमिक धडे देण्यावर भर दिला. बेल्जियम, इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर भारताने स्पेनविरुद्ध बरोबरी पत्करली. पण ऑस्ट्रेलिया आणि नंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यामुळे भारताला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारतीय संघाच्या क्षमतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
राष्ट्रकुल स्पर्धेद्वारे उभारी
पराभवानंतर पेटून उठण्याच्या वृत्तीने भारताला ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत तारले. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड आणि वेल्सचा समावेश असलेल्या ‘अ’ गटातून भारताने दुसरे स्थान पटकावून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. बाद फेरीत मजल मारताना भारताने वेल्स, स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पाडाव केला होता. भारतासाठी न्यूझीलंडचे कडवे आव्हान असतानाही दमदार कामगिरी करीत सर्वाची मने जिंकली. १८ व्या मिनिटाला ०-२ ने पिछाडीवर पडलेल्या भारताने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करीत रुपिंदरपाल सिंग, रमणदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांच्या गोलच्या बळावर किवींचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकाच्या लढतीत मात्र जगज्जेत्या ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघ निष्प्रभ ठरला. ऑस्ट्रेलियाने ४-० अशा फरकाने भारताचा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरले. नील हावगुड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला मात्र पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रितू राणीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण बलाढय़ संघांसमोर भारताची डाळ शिजली नाही. अर्जुन पुरस्कारासाठी भारताच्या एकाही खेळाडूची निवड न झाल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
आशियाई स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकचे तिकीट
इन्चॉन येथील आशियाई स्पर्धेच्या साखळी गटात श्रीलंकेचा ८-० ने तर ओमानचा ७-० ने धुव्वा उडवीत भारताने थाटात सुरुवात केली, पण पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून भारताला २-१ असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर चीनचा २-० असा पाडाव करीत भारताने ‘ब’ गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य फेरीत यजमान दक्षिण कोरियाचा पाडाव करण्याचे आव्हान भारतासमोर होते. आकाशदीप सिंगने ४४ व्या मिनिटाला केलेला गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरला. अंतिम फेरीत पाकिस्तानशी झुंज द्यावी लागणार असल्यामुळे मागील पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताला होती. मुहम्मद रिझवानने तिसऱ्याच मिनिटाला गोल करून पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. अखेर कोठाजित सिंगच्या गोलमुळे भारताने बरोबरी साधली. पेनल्टी-शूटआऊटमध्ये रंगलेल्या या लढतीत अखेर भारताने ४-२ असा ‘चक दे इंडिया’च्या थाटात विजय मिळवून तब्बल १६ वर्षांनी आशियाई स्पर्धेच्या सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. या कामगिरीमुळे भारताने २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. महिला संघानेही कांस्यपदकावर मोहोर उमटवली.
वॉल्श यांचा राजीनामा
हॉकी इंडियाच्या कारभारावर ताशेरे ओढत भारताचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने हॉकीचाहत्यांमध्ये खळबळ उडाली. वॉल्श यांनी राजीनामा परत घेण्यासाठी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने प्रयत्न केले. निर्णय घेण्याचे सर्वाधिकार तसेच संघनिवडीत कुणाचाही हस्तक्षेप नको, असे सांगत वॉल्श यांनी सुधारित करार करण्याचे मान्य केले. पण अमेरिका हॉकी संघाचे प्रशिक्षकपद भूषवताना वॉल्श यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा दाखला देत हॉकी इंडियाने वॉल्श यांचा करार रद्दबातल ठरवला.
ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील यश
आशियाई स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनेक अडथळे पार करीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत ३-१ असे पराभूत करण्याचा करिश्मा केला. याचे श्रेय सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला जाते. त्यानंतर भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेतही भारताने चौथ्या क्रमांकावर मजल मारली. भारताच्या २१ वर्षांखालील युवा संघानेही सुल्तान जोहोर चषक स्पर्धेचे जेतेपद कायम राखत हे वर्ष संस्मरणीय ठरवले. आता भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाला प्रशिक्षकाची गरज भासत असली तरी ऑलिम्पिकच्या तयारीसाठी कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे.