हॉकी इंडियाने गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेली प्रशिक्षक बदलाची परंपरा कायम राखत, पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षकांच्या खांद्यावर भारतीय हॉकी संघाची जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, झालेल्या आढावा बैठकीत जोर्द मरीन यांना पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यापुढे भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडणार आहेत.
रोलंट ओल्टमन्स यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हरेंद्र सिंह भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र हॉकी इंडियाने जोर्द मरीन यांना प्रशिक्षकपदी नेमून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र आशिया चषकाचा अपवाद वगळता जोर्द मरीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. सुलतान अझलन शहा चषक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पदक मिळवण्यात अयशस्वी ठरला. यानंतर हॉकी इंडिया मरीन यांच्या कारभारावर खुश नसल्याचं समोर आलं होतं.
हरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याशिवाय भारतीय संघातील अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा हरेंद्र सिंह यांच्याकडे अनुभव आहे. जोर्द मरीन यांच्या कार्यकाळात सरदार सिंह आणि अन्य ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देत तरुण खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं होतं. मरीन यांच्या या भूमिकेवर संघातील काही खेळाडू नाराज असल्याचंही समोर आलेलं होतं. त्यामुळे आगामी काळात हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी, विश्वचषक यांसारख्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे या स्पर्धांमध्ये हरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.