ओल्ट्समन्स यांना साहाय्य करणार
माजी ऑलिम्पिकपटू महाराज कृष्णन कौशिक यांच्याकडे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून भारतीय हॉकीचे उच्च कामगिरी संचालक रोलॅन्ट ओट्समन यांना ते साहाय्यक म्हणून काम करतील. संघाचे मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांना मंगळवारी त्यांच्या पदावरून डच्चू देण्यात आला होता.
मॉस्को येथे १९८० मध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघाचे कौशिक यांनी प्रतिनिधित्व केले होते. ओल्ट्समन्स यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांना कौशिक मदत करतील. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मंगळवारी नॉब्स यांच्याशी केलेला करार रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र आपली हकालपट्टी झाली नसून प्रकृतीच्या कारणास्तव आपणच या पदाचा राजीनामा दिला असल्याचे नॉब्स यांनी सांगितले होते.
बंगळुरु येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय हॉकी शिबिरात १६ जुलै रोजी कौशिक रुजू होतील. इपोह (मलेशिया) येथे २४ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा होत असून ही स्पर्धा कौशिक यांच्याकरिता पहिली कसोटी असेल. ही स्पर्धा जागतिक स्पर्धेसाठी पात्रता फेरी असल्यामुळे भारतीय संघाकरिता त्यास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. मी वेगवेगळ्या खेळांडूंबरोबर यापूर्वी प्रशिक्षक म्हणून काम केले असल्यामुळे तो अनुभव मला माझ्या नवीन जबाबदारीसाठी उपयुक्त ठरणार आहे. संघ व्यवस्थापनाबरोबर मी सविस्तर चर्चा करणार असून भारतीय संघ नेमका कोठे कमी पडतो याबाबत माहिती मिळविणार आहे.
इपोह येथील स्पर्धा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे थोडेसे दडपण आहेच. प्रशिक्षकपद म्हणजे सतत डोक्यावर टांगती तलवार असते. ही जबाबदारी मी यशस्वी रीत्या पार पाडेन, असा आत्मविश्वासही कौशिक यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा