जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाच्या अचंबित करणाऱ्या कामगिरीइतकीच चर्चा युवराज आणि देविंदर या वाल्मीकी बंधूंची होत आहे. युवराज व देविंदर यांनी फ्रान्सविरुद्धच्या लढतीत एकत्र खेळून नवा इतिहास घडविला. धाकटय़ा देविंदरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय लढत होती आणि त्याने गोल करून आपली निवड सार्थ ठरवली. पोलंडविरुद्धच्या लढतीत तर दोन्ही भावंडांनी गोल करून भारताला दणदणीत विजय साकारून दिला. जवळपास आठ दशकांपूर्वी ध्यानचंद आणि रूप सिंग या बंधूंनी आंतरराष्ट्रीय लढतीत एका सामन्यात गोल करण्याचा विक्रम केला होता. त्याची पुनरावृत्ती वाल्मीकी बंधूंनी केली. पण, या विक्रमांपेक्षा भारताचे सोनेरी दिवस परत आणायचे आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकवून देण्यातच खरे यश आहे, असा निर्धार देविंदरने व्यक्त केला. पोलंडविरुद्धच्या ‘त्या’ ऐतिहासिक  भरारीनंतर बेल्जियममध्ये असलेल्या देविंदरशी केलेली ही खास बातचित.
पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आणि पहिला गोल, याबद्दल काय सांगशील?
आतापर्यंत कनिष्ठ गटातील स्पर्धामध्ये मी सातत्याने केलेल्या कामगिरीची पोचपावती म्हणून राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. हॉकी इंडिया लीगमध्ये मी राष्ट्रीय संघातील बहुतांश खेळाडूंसह खेळलो होतो. पण, तो अनुभव वेगळा आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव वेगळा. मिळालेल्या संधीचं सोने करायचे, याच निर्धाराने मैदानात उतरलो आणि यशही मिळाले. तो क्षण अधिक आनंद देणारा आणि प्रोत्साहन वाढवणारा होता.
जागतिक हॉकी लीगमध्ये भारतीय संघात अनेक अनुभवी खेळाडू नाहीत. काहींना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. अशा परिस्थितीत प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांनी युवा खेळाडूंना खेळवण्याचे धाडस दाखविले आणि त्यात तुझाही समावेश आहे. त्याचे दडपण होते का?
मी आधी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय संघातील बहुतेक खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मला मिळालेली आहे. त्यामुळे दडपण थोडे कमी होते. पण, दडपण अजिबात नव्हते असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण, माझी पहिलीच आंतरराष्ट्रीय लढत होती. प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवून गोल करण्याचे आव्हान होते आणि संघातील प्रत्येक खेळाडूकडून मिळालेल्या मदतीमुळे ते शक्य झाले. हा सांघिक खेळ आहे आणि प्रत्येकाने योगदान देणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या योगदानानंतर निकाल काय लागतो, हे आपण पाहिले असालच. वरिष्ठ खेळाडूंकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.
या वरिष्ठ खेळाडूंमध्ये तुझ्या भावाचाही समावेश आहे. त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून देशाचे प्रतिनिधित्व करतानाची भावना कशी व्यक्त करशील?
मी लहानपणापासूनच युवराजचा खेळ पाहत आलोय. हॉकीसाठी त्याने घेतलेली मेहनत पाहूनच मलाही या खेळाप्रती आवड निर्माण झाली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवत या खेळाकडे वळलो. दोघांनीही एकत्र राष्ट्रीय संघात खेळावे असे स्वप्न आम्ही पाहिले आणि ते आता प्रत्यक्षात उतरले, ही भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. बस एवढेच सांगू शकतो, की मला फार आनंद झाला आहे.
युवराज आणि तुझी मैदानावरची आणि मैदानाबाहेरचे नाते कसे आहे?
त्याने नेहमी मला मार्गदर्शन केले. थोरल्या भावाची भूमिका तो अचूकपणे पार पाडतो. त्याच्याकडून हॉकीचे ‘बाळकडू’ मिळाल्यामुळे आमच्यातील नाते चांगले आहे, असे मी ठामपणे म्हणू शकतो. मैदानाबाहेरही त्याचे मार्गदर्शन मला मिळते.
जवळपास दशकानंतर भारताच्या राष्ट्रीय संघात बंधू खेळले आणि त्यांनी गोल करण्याचा विक्रमही केला, हा अनुभव कसा होता?
आनंद झाला. फ्रान्सविरुद्ध केवळ मलाच गोल करण्यात यश मिळाले, परंतु पोलंडविरुद्ध युवराजने ती कसर भरून काढली आणि आम्हा दोघांना गोल करण्यात यश मिळाले. खरे सांगायचे तर, या विक्रमापेक्षा आम्ही भारताच्या विजयात हातभार लावतोय, ही बाब अधिक आनंददायी आहे. असाच हातभार लावून आम्हाला देशाला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकवून द्यायचे आहे. त्यामुळे या विक्रमापेक्षा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि तसे झाल्यास याहून अधिक अभिमानास्पद बाब आमच्यासाठी असूच शकणार नाही.
प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांनी वरिष्ठ खेळाडूंसह युवांवरही अधिक विश्वास दाखविला. त्यांच्या कार्यशैलीबाबत काय सांगशील ?
प्रत्येक प्रशिक्षकाची शैली निराळी असते. त्यांनी वरिष्ठ आणि युवा खेळाडूंची चांगली सांगड घातली आहे. प्रत्येक खेळाडूला स्वत:मधील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी हवी असते. मला ती मिळाली. तिचं सोनं करणे हे माझ्या हातात आहे. सर्वोत्तम कामगिरी करून संघातील स्थान कायम राखण्याचा माझा प्रयत्न असेल आणि सामन्यागणिक त्यात खेळ उंचावण्याचे लक्ष्य समोर आहे.

Story img Loader