सलामीच्या लढतीत दिल्लीची गाठ पंजाबशी
पहिल्यावहिल्या हॉकी इंडिया लीगला अखेर पुढील वर्षी १४ जानेवारीला मुहूर्त मिळाला आहे. दिल्ली वेव्हरायडर्स आणि जेपी पंजाब वॉरियर्स यांच्यातील सलामीच्या सामन्याने स्पध्रेला प्रारंभ होईल आणि १० फेब्रुवारीला विजेत्यावर शिक्कामोर्तब होईल. २८ दिवसांत ३४ सामन्यांचा समावेश असलेली हॉकी इंडिया लीग दिल्ली, जालंधर, लखनौ, मुंबई आणि रांची या पाच फ्रेंचायझींच्या शहरात रंगणार आहे.
दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर या महत्त्वाकांक्षी स्पध्रेचे उद्घाटन होणार आहे. दिल्ली-पंजाब यांच्यात होणाऱ्या या सामन्यात क्रीडारसिकांना ऑस्ट्रेलियाचा हॉकीपटू जॅमी ड्वेयरचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. १६ जानेवारीला जालंधदरच्या सुरजित सिंग हॉकी स्टेडियमवर यजमान जेपी पंजाब वॉरियर्सचा संघ रांची ऱ्हीनोसचा सामना करणार आहे. याच दिवशी उशिरा मुंबई मॅजिसियन्स आपला पहिला सामना दिल्लीमध्ये दिल्ली वेव्हरायडर्सशी खेळणार आहे. मुंबईकरांना पहिला सामना पाहण्याची संधी २० जानेवारीला लाभणार आहे. मुंबई हॉकी असोसिएशनच्या स्टेडियमवर मुंबईचा सामना जेपी पंजाब वॉरियर्सशी होणार आहे.
दिल्ली, जालंधर, मुंबई आणि रांची येथे कृत्रिम प्रकाशझोतामध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत, तर लखनौचे सामने सकाळचे होणार आहेत. उपांत्य फेरीचे दोन सामने ९ फेब्रुवारीला होणार आहेत, तर तिसऱ्या स्थानासाठीचा आणि अंतिम सामना १० फेब्रुवारीला होणार आहे. या चारही बाद फेरीच्या सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.