हॉकी इंडिया लीग हा आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा क्रीडाप्रकार असून या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारतास पुन्हा नावलौकिक प्राप्त होईल, असा आत्मविश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारासिंग याने येथे व्यक्त केला.
सरदारासिंग हा या स्पर्धेतील उत्तरप्रदेश विझार्ड्स संघाकडून खेळत आहे. तो म्हणाला,‘‘ जेमी डायर, टय़ुन देनुईजीर यांच्यासारखे अव्वल दर्जाचे परदेशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे ही स्पर्धा अतिशय रंगतदार होणार आहे. या स्पर्धेद्वारे भारतीय खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. विशेषत: नवोदित खेळाडूंसाठी ही स्पर्धा त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेत पन्नासपेक्षा जास्त ऑलिम्पिकपटू सहभागी झाले आहेत. तसेच संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूही विविध फ्रँचाईजीकडून खेळत असल्यामुळे प्रेक्षकांनाही अव्वल दर्जाच्या हॉकीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.’’
हॉकी कसोटी सामन्यांच्या मालिकांची संख्या कमी होत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना अनुभव मिळण्यासाठी हॉकी लीगसारख्या स्पर्धा उपयुक्त ठरणार आहेत, असे सांगून सरदारासिंग म्हणाला, या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आर्थिक लाभही मोठय़ा प्रमाणावर होतो आणि त्याचा उपयोग त्यांना भविष्यातील कारकीर्दिसाठीही होतो. हॉकी लीग व आयपीएल स्पर्धेची तुलना करणे अयोग्य होईल, कारण हॉकी लीग यंदा सुरु झाली आहे. एक मात्र नक्की, की हॉकी लीगसारख्या स्पर्धामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा उंचावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा