२६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान बेल्जियम दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने आपल्या २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. मनप्रीत सिंहकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून हरमनप्रीत संघाचा उप-कर्णधार म्हणून खेळणार आहे. या दौऱ्यात भारत बेल्जियमविरुद्ध ३ तर स्पेनविरुद्ध २ सामने खेळणार आहे.
ललित कुमार उपाध्याय आणि रुपिंदरपाल सिंह या दोन अनुभवी खेळाडूंनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. अनुभवी गोलकिपर पी.आर.श्रीजेशसोबत क्रिशन पाठकलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. नोव्हेंबर महिन्यात भारत ओडीशातील भुवनेश्वर शहरात रशियाविरुद्ध ऑलिम्पिक पात्रता सामने खेळणार आहे. त्या मालिकेआधी भारतीय हॉकीसाठी बेल्जियम दौरा उपयुक्त ठरेल अशी भावना प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी व्यक्त केली आहे.
असा असेल भारतीय हॉकी संघ –
गोलकिपर – पी.आर.श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक
बचावफळी – हरमनप्रीत सिंह (उप-कर्णधार), सुरेंद्र कुमार, बिरेंद्र लाक्रा, वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंह, कोठाजीत सिंह, रुपिंदरपाल सिंह
मधली फळी – मनप्रीत सिंह (कर्णधार), हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, निलकांत शर्मा
आघाडीची फळी – मनदीप सिंह, एस.व्ही.सुनील, ललित कुमार उपाध्याय, रमणदीप सिंह, सिमरनजीत सिंह, आकाशदीप सिंह