Hockey India Tweets for Indian Cricket Team: आशिया चषक २०२३ मध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निकाल लागला नसेल, परंतु हॉकीच्या मैदानावर भारताने पाकिस्तानचा पराभव करून पुरुष हॉकी 5S आशिया चषक विजेतेपद पटकावले. ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा शूटआऊटमध्ये २-० असा पराभव केला. यासह टीम इंडियाने एफआयएच पुरुष हॉकीने 5S विश्वचषक २०२४ मध्येही प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉकी इंडियाने मागितली क्रिकेट आशिया कप ट्रॉफी –

पाकिस्तानवरच्या या दणदणीत विजयानंतर हॉकी इंडियाने भारतीय क्रिकेट संघाला संदेश दिला आहे. हॉकी इंडियाच्या ट्विटर हँडलवरून एका ट्विटद्वारे असे म्हटले आहे की, “आम्ही आमची ट्रॉफी उचलली आहे आणि आता आम्ही आशिया कप जिंकण्याची वाट पाहत आहोत जेणेकरून विजयाचा आनंद द्विगुणित करता येईल.”

आशिया चषकातील भारताचा पहिला सामना रद्द –

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ३० ऑगस्टपासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली सुरू झाली असून शनिवारी भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता, मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. टीम इंडियाने पाकिस्तानला २६७ धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण दुसऱ्या डावात एकही चेंडू टाकता आला नाही. भारताकडून इशान किशन (८२) आणि हार्दिक पांड्या (८७) यांनी सर्वाधिक धावा केल्या. त्याचवेळी शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs PAK: सामना रद्द झाल्यानंतर इरफान पठाणच्या ट्विटने पेटले नवे युद्ध, पाकिस्तानी चाहते म्हणाले…

हॉकी सामन्यातील शूटआउटचा निकाल –

भारत-पाकिस्तानच्या हॉकी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, निर्धारित वेळेत सामना ४-४ असा बरोबरीत सुटला. यानंतर शूटआऊट फेरी घेण्यात आली, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा २-० असा पराभव केला. भारताकडून गुरजोत सिंग आणि मनिंदर सिंग यांनी शूटआऊटमध्ये गोल केले. त्याचबरोबर निर्धारित वेळेत भारतासाठी मोहम्मद राहिल (१९व्या आणि २६व्या), जुगराज सिंग (सातव्या) आणि मनिंदर सिंग (१०व्या) मिनिटाला गोल केले. पाकिस्तानकडून अब्दुल रहमान (पाचव्या), कर्णधार अब्दुल राणा (१३व्या), झिकारिया हयात (१४व्या) आणि अर्शद लियाकत (१९वा) मिनिटाला गोल केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey india wishes indian cricket team to win the asia cup 2023 vbm
Show comments