भारतीय संघ कनिष्ठ गटाच्या जोहर बाहरू चषक हॉकी स्पर्धेतील साखळी गटातील अखेरच्या सामन्यात अर्जेटिनाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे. त्याकरिता त्यांना बुधवारी सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे.
भारताने या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ५-१ अशी धूळ चारली होती, मात्र त्यांना नंतरच्या लढतीत इंग्लंडने ४-३ असे हरवले होते. इंग्लंडविरुद्ध आक्रमक सुरुवात करून भारताला हा सामना गमवावा लागला होता. भारताने गतवेळी या स्पर्धेत अर्जेटिनावर ३-२ अशी मात केली होती. बुधवारच्या लढतीत पुन्हा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करील, अशी आशा आहे. २०१३ मध्ये या स्पर्धेत भारताला अर्जेटिनाशी दोन वेळा लढत द्यावी लागली होती. दोन्ही वेळा त्यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेतही भारताने अर्जेटिनाला हरवले होते. हे लक्षात घेता भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारताच्या आक्रमणाची बाजू सुमितकुमार, अरमान कुरेशी व परविंदर सिंग यांच्यावर अवलंबून आहे.
अर्जेटिनाने येथे पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियावर १-० अशी मात केली होती. या विजयामुळे अर्जेटिनाच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे.
‘‘भारतीय खेळाडू अर्जेटिनाच्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी उत्सुक झाले आहेत. इंग्लंडविरुद्ध आम्ही जरी पराभव स्वीकारला असला तरी या सामन्यात आम्ही त्यांना शेवटपर्यंत चांगली लढत दिली होती. आमचे खेळाडू सकारात्मक खेळ करतील अशी मला खात्री आहे,’’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी सांगितले.
‘‘आम्ही आजपर्यंत अनेक वेळा अर्जेन्टिनाविरुद्ध विजय मिळविला आहे. त्यांच्या शैलीचा आम्ही बारकाईने अभ्यास केला आहे. येथेही पुन्हा त्यांच्यावर मात करण्यासाठीच आम्ही खेळणार आहोत. त्यांच्याकडेही अनुभवी खेळाडू असल्यामुळे आम्ही फाजील आत्मविश्वास ठेवलेला नाही,’’ असे भारताचा कर्णधार हरजित सिंगने सांगितले.