उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या भारताला कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ९ ते १२व्या क्रमांकांसाठी लढावे लागणार आहे. गुरुवारी भारताची लढत अर्जेटिनाशी होणार आहे.
दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत ३-३ अशी बरोबरी स्वीकारल्यामुळे भारताचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले. कोरिया व भारत यांचे समान गुण झाले, मात्र कोरियाने कॅनडाविरुद्ध ७-० असा मोठा विजय मिळविल्यामुळे गोलसंख्येच्या सरासरीत त्यांनी भारतास मागे टाकले आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये भारत स्थान मिळविणार की नाही, हीच उत्सुकता बाकी आहे. कोरियाविरुद्ध ३-१ अशी आघाडी असताना भारताने सामना गमावल्यामुळे भारतास आता प्ले-ऑफ लढतींमध्ये खेळावे लागणार आहे.
अर्जेटिना हा तुल्यबळ संघ असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विजय मिळविणे, हे भारतासाठी आव्हानच असल्यामुळे या सामन्यात त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.  
भारताच्या पराभवाची जबाबदारी बात्रा यांनी स्वीकारली
नवी दिल्ली :भारताचे कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले. या पराभवाची जबाबदारी हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांनी स्वीकारली असून, भारताच्या खराब कामगिरीबाबत प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
बात्रा यांनी सांगितले, ‘‘दक्षिण कोरियाविरुद्ध चांगली आघाडी असताना भारतीय संघ खेळावर नियंत्रण ठेवू शकला नाही. गोल करण्याच्या अनेक संधी त्यांनी वाया घालविल्या. अन्यथा हा सामना आपण सहज जिंकला असता. संघाच्या पराभवाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक व साहाय्यक कर्मचाऱ्यांना दोष देऊ नका. हॉकी इंडियाचा महत्त्वाचा अधिकारी या नात्याने मी या पराभवास जबाबदार आहे.

Story img Loader