हॉकी इंडियातर्फे आयोजित केली जाणारी हॉकी इंडिया लीग स्पर्धा भारताच्या तरुण खेळाडूंना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तसेच त्याचा फायदा भारतीय हॉकी संघासही होणार आहे, असे ऑस्ट्रेलियाचा अव्वल दर्जाचा हॉकीपटू जेमी डायर याने येथे सांगितले.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले अनेक अनुभवी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंना भावी कारकिर्दीसाठी येथे पुष्कळ शिकवणींची शिदोरी मिळणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशांचे खेळाडू सहभागी झाले असल्यामुळे खेळाडूंना त्यांची भाषा, संस्कृती, सवयी आदींबाबत मिळते जुळते घेण्यासाठी कसोशीनेच प्रयत्न करावा लागणार आहे. हे एक आव्हानच प्रत्येक भारतीय खेळाडूंना स्वीकारावे लागणार आहे. एकमेकांचा आदर राखणेही महत्त्वाचे आहे. असे सांगून डायर म्हणाला, स्पर्धेच्या सुरुवातीस सांघिक समन्वय साधणे कठीण असले तरी अधिकाधिक सामन्यांमुळे सांघिक कौशल्य वाढेल.
डायर हा पंजाब वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे. त्याच्या संघात भरत छेत्री, व्ही.सुनील, शिवेंद्रसिंग (भारत), किरॉन गोव्हर्स, रॉब हॅमंड, मार्क नॉलेस (ऑस्ट्रेलिया) यांचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया व भारत या दोन्ही संघांमधील खेळाडूंची खेळण्याची शैली सारखीच आहे. फक्त आमचे खेळाडू जास्त वेगवान चाली करतात व तीच आमची जमेची बाजू आहे असेही डायर याने सांगितले. पंजाब वॉरियर्सचे सल्लागार व माजी ऑलिम्पिकपटू जफर इक्बाल यांनी सांगितले, संघास भारतीय प्रशिक्षक नसले तरी फारशी अडचण येणार नाही. उलट ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ही भारतीय खेळाडूंसाठी फायद्याचीच गोष्ट आहे. आमच्या संघात सहा-सात युवा खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी ही स्पर्धा सोनेरी संधीच आहे. त्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा