भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाचा आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिक प्रवेश जवळपास निश्चीत मानलं जात आहे. आशियाई खेळांमध्ये विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारताला घरच्या मैदानावर FIH Hockey Series स्पर्धेत खेळावं लागलं होतं. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय पुरुष संघासमोर दुबळ्या रशियाचं तर महिला संघासमोर अमेरिकेच्या संघाचं आव्हान असणार आहे. १-२ नोव्हेंबर रोजी ओडीशातील भुवनेश्वर शहरात हे सामने खेळवले जाणार आहेत.
जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष संघ पाचव्या तर रशियाचा संघ २२ व्या स्थानावर आहे. दोन सामन्यांची मालिका जिंकणाऱ्या संघाला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमधील भारतीय हॉकी संघाची कामगिरी पाहता, भारताचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चीत मानला जात आहे. जुन महिन्यात ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारताने रशियावर १०-० ने मात केली होती.