भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारी हॉकी कसोटी सामन्यांची मालिका अखेर रद्द करण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावपूर्ण राजकीय मतभेदांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
पाकिस्तानचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेकरिता पुढील महिन्यात भारतात येणार होता व त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळणार होता. परराष्ट्र मंत्रालयाने या मालिकेला परवानगी नाकारली आहे. भारताने अझजल गुरू याला फाशी दिल्याबद्दल पाकिस्तानने संसदेत त्याविरोधी ठराव मंजूर करीत भारताचा निषेध केला होता. तसेच पाकिस्तानशी संबंधित असलेल्या फिदायीनच्या अतिरेक्यांनी नुकताच श्रीनगर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर हल्ला करीत पाच जवानांना ठार मारले. या दोन्ही घटनांमुळे परराष्ट्र मंत्रालयाने हॉकी मालिकेस परवानगी दिली नाही.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांनी सांगितले, ‘‘नियमानुसार आम्हाला या मालिकेकरिता केंद्रीय क्रीडा मंत्रालय, गृहमंत्रालय व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्याकडून ना हरकत दाखला घ्यावा लागतो. आम्हाला क्रीडा मंत्रालय व गृहमंत्रालय यांनी परवानगी दिली, मात्र परराष्ट्र खात्याने नकार दिल्यामुळेच आम्हाला नाइलाजास्तव ही मालिका रद्द करावी लागत आहे. आम्ही परराष्ट्र खात्याच्या निर्णयाचा आदर राखत आहोत. ही मालिका झाली असती तर आम्हास नक्कीच आनंद झाला असता; मात्र देशाभिमान व देशाची प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची आहे. मी पाकिस्तान हॉकी महासंघास दोष देत नाही. पाकिस्तानमध्येच जे काही अस्थिर वातावरण आहे, त्याचीही दखल घेण्याची आवश्यकता आहे.’’
पाकिस्तानचा संघ ५ ते १५ एप्रिल या कालावधीत रांची, लखनौ, दिल्ली, मोहाली, जालंधर येथे सामने खेळणार होता. त्यानंतर २३ एप्रिलपासून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. तेथे लाहोर, फैसलाबाद, कराची व सियालकोट येथे कसोटी सामने आयोजित केले जाणार होते.
मालिका रद्द होण्याबद्दल केंद्रीय परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘तांत्रिक कारणास्तवच ही मालिका स्थगित केली असावी. आमच्या खात्याकडून परवानगी मिळाली नाही म्हणून ही मालिका रद्द करावी लागली हे मला पटत नाही. माझ्याकडे तरी याबाबत कोणतीही माहिती नाही.’’
परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी सांगितले, ‘‘क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करणे अयोग्य आहे. राजकारण व क्रीडा क्षेत्र यांची गल्लत केली जाऊ नये, हॉकी इंडियाने जानेवारीत वर्ल्ड हॉकी सीरिज आयोजित केली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या सीमेवर भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यात भारताचे अनेक जवान ठार झाले होते. त्यामुळे त्या स्पध्रेमध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना मायदेशी पाठवावे लागले होते.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा