विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाची पराभवाची मालिका कायम राहिली. दुसऱ्या लढतीत बलाढय़ इंग्लंडने भारतावर २-१ अशी मात केली. शेवटच्या क्षणांमध्ये गोल होऊ देण्याच्या कमकुवतपणामुळे भारताला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. ६९व्या मिनिटाला सिमोन मॅनटेलच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलद्वारे इंग्लंडने सरशी साधली.
या सामन्यात इंग्लडतर्फे मार्क ग्लेगहॉर्नने २६व्या मिनिटाला गोल केला. याला तात्काळ प्रत्युत्तर देत भारताकडून ३०व्या मिनिटाला धर्मवीर सिंगने गोल करत बरोबरी केली. ११व्या मिनिटाला भारताला पेनल्टीची संधी मिळाली. २५ गज वर्तुळातील युवराज वाल्मिकीच्या विनाकारण हस्तक्षेपामुळे इंग्लंडला पहिल्यांदा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. मार्क ग्लेगहॉर्नने गोल करत या संधीचे सोने केले. भारतातर्फे सरदार सिंगने धर्मवीरकडे चेंडू सोपवला. त्याने सुरेख गोल करत भारताला बरोबरी करून दिली. यानंतर युवराज वाल्मिकीने गोलपोस्टच्या समोरून गोल करण्याची संधी वाया घालवली. एस.व्ही.सुनीलने दिलेल्या क्रॉसच्या फटक्याला गोलपोस्टची दिशा देण्यात युवराजला अपयश आले. भारतीय संघाने इंग्लंडला नेटाने टक्कर दिली, मात्र अचूकतेमधली कमी, घाई आणि नशिबाने साथ न दिल्याने गोलसंख्या वाढली नाही. इंग्लंडने पेनल्टीच्या जोरावर सरशी साधत विजय मिळवला.
भारताची पुढची लढत स्पेनशी होणार आहे.

Story img Loader