ओडीशात सुरु असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताचं आव्हान कालच्या सामन्यात अखेर संपुष्टात आलं. नेदरलँडने भारतावर २-१ ने मात करत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी भारताच्या पराभवाचं खापर पंचांच्या सदोष कामगिरीवर फोडलं आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अवश्य वाचा – BLOG : वाट पाहूनी जीव थकला !

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने या समस्येकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. एका वर्षात आम्हाला दोन स्पर्धांमध्ये या सदोष पंचगिरीचा फटका बसला आहे. “मी प्रशिक्षक या नात्याने सर्व देशाची माफी मागतो. जो खेळ आमच्याकडून अपेक्षित होता, तसा खेळ आम्ही खेळलो नाही. पण पंचांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करणं गरजेचं आहे, जर अशीच सदोष पंचगिरी सुरु राहिली तर भविष्यकाळात असेच निकाल लागतील. अमित रोहिदासला पिवळं कार्ड देण्यामागचं कारण कोणी सांगू शकेल. मनप्रीतलाही मागून धक्का दिला होता, मात्र त्यावेळी पंचांनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं. आशियाई खेळांमध्येही आम्हाला याचा फटका बसला होता.” हरेंद्रसिंह बोलत होते.

मात्र या घटनेविरोधात आपण तक्रार करणार नसल्याचंही हरेंद्रसिंह यांनी स्पष्ट केलं. जो निकाल लागला आहे तो मान्य करायलाच हवा. पंचांनी दिलेल्या निर्णयावर दाद मागितल्यानंतर ९९ टक्के तिसऱ्या पंचांनी मैदानावरच्या पंचांचा निर्णय रद्द केला आहे. यावर दाद मागायला गेलं तरीही काही हाती लागत नाही हा माझा अनुभव आहे. पंचांचा एक चुकीचा निर्णय एखाद्या संघाच्या ३-४ वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकतो, हरेंद्रसिंहांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – Mens Hockey World Cup 2018 : ४३ वर्षांची प्रतीक्षा कायम, भारत नेदरलँडकडून पराभूत

Story img Loader