भुवनेश्वर : जेरेमी हेवर्ड आणि टॉम क्रेग यांच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने ‘एफआयएच’ पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अ-गटातील सामन्यात शुक्रवारी फ्रान्सला ८-० असे नमवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी फ्रान्सला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. क्रेगने आठव्या, ३१व्या आणि ४४व्या मिनिटाला मैदानी गोल केले. तर हेवर्डने १२ मिनिटांच्या आत तीन गोल झळकावले. त्याने २६व्या, २८व्या आणि ३८व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सवर दबाव निर्माण केला. फ्रान्सने गोल करण्याचे प्रयत्न केले, मात्र ऑस्ट्रेलियाच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांचा निभाव लागला. त्यामुळे त्यांना निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

त्यापूर्वी, अर्जेटिनाला जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगले आव्हान दिले. मात्र, सामना अर्जेटिनाने १-० असा जिंकला. पहिल्या सत्रात कोणताही गोल झाला नाही. अर्जेटिनासाठी ४२व्या मिनिटाला केसला मेइकोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत अर्जेटिनाने आपली ही आघाडी कायम राखली. उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. मात्र, त्याचा फायदा त्यांना उचलता आला नाही. अखेर अर्जेटिनाने आपली आघाडी कायम राखत विजय साकारला.

दिवसाच्या तिसऱ्या लढतीत लिआम अन्सेलच्या दोन गोलच्या बळावर इंग्लंडने वेल्सवर ५-० असा विजय मिळवला. इंग्लंडकडून निकोलस पार्कने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाका गोल केला. यानंतर लिआमने २८व्या व ३८व्या मिनिटाला गोल झळकावत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. नंतर फिल रॉपर (४२वे मि.) आणि निकोलस बॅनडुराक (५८वे मि.) यांनी गोल मारत संघाला ५-० अशा मजबूत स्थितीत पोहोचवले. संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय नोंदवला.

आजचे अन्य सामने

न्यूझीलंड वि. चिली : ’ वेळ : दुपारी १ वा.

नेदरलँड्स वि. मलेशिया : ’ वेळ : दुपारी ३ वा.

बेल्जियम वि. कोरिया : ’ वेळ : सायं. ५ वा.

जर्मनी वि. जपान : ’ वेळ : सायं. ७ वा.