दडपणाखाली खेळताना केलेल्या अक्षम्य चुकांमुळेच भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-४ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. हे चारही गोल पूर्वार्धातच नोंदवले गेले.
एकतर्फी झालेल्या या लढतीत भारतीय खेळाडूंनी बलाढय़ कांगारूंविरुद्ध खेळताना कचखाऊ वृत्तीचा प्रत्यय घडविला. त्यामुळेच की काय त्यांना एकही पेनल्टी कॉर्नर मिळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस किर्लेलो याने १६व्या व २२व्या मिनिटाला गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. किरॉन गोव्हर्स (तिसरे मिनिट) व जेरेमी हेवर्ड (२०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
वेगवान चाली, उत्कृष्ट सांघिक समन्वय व गोल करण्यासाठी आवश्यक असणारी अचूकता याचा प्रत्यय घडवत कांगारूंनी या लढतीत भारताला फारशी संधी दिली नाही. सामन्याच्या प्रारंभापासूनच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धारदार आक्रमणास सुरुवात केली. तिसऱ्याच मिनिटाला भारताच्या बचाव फळीतील गलथानपणाचा फायदा घेत त्यांच्या किरॉन याने गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर अधिकाधिक वेळ ऑस्ट्रेलियन खेळांडूकडेच खेळाची सूत्रे होती. १६व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत किर्लेलो याने स्वत:चा पहिला व संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर चार मिनिटांनी पुन्हा त्यांना आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. जेरेमी याने गोल करीत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. या धक्क्य़ातून भारतीय खेळाडू सावरत नाही तोच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार चाल करीत पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्यावर किर्लेलो याने गोल करीत संघास ४-० असे अधिक्य मिळवून दिले. उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाकडेच खेळाची सूत्रे होती. त्यांना दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना यश मिळाले नाही. भारतीय खेळाडूंनी पूर्वार्धात झालेल्या चुका उत्तरार्धात टाळल्या व आणखी गोल स्वीकारला नाही.

Story img Loader