28 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाने जोरदार सराव सुरु केला आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताने 2016 रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा 5-0 ने धुव्वा उडवला. भारताकडून हरमनप्रीत सिंह, ललित उपाध्याय, दिलप्रीत, निलकांत शर्मा आणि हार्दिक सिंह यांनी गोल झळकावले. रविवारी भारत स्पेनविरुद्ध आपला दुसरा सराव सामना खेळणार आहे.
भारताने झळकावलेल्या 5 गोलपैकी पहिला आणि तिसरा गोल हा पेनल्टी कॉर्नरवर झळकावण्यात आला होता, बाकीचे 3 गोल हे मैदानी गोल नोंदवले गेले. भारतीय संघाने केलेल्या अष्टपैलू कामगिरीचं प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी कौतुक केलं. मधल्या काळात भारताने सामन्यावर आपलं नियंत्रण गमावलं होतं, यादरम्यान अर्जेंटिनाने दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. विश्वचषकासारख्या स्पर्धेत अशा चुका करणं भारताला महाग पडू शकतं असंही मत हरेंद्रसिंह यांनी व्यक्त केलं.